कोणत्याही संस्थेचा चतुर्थश्रेणी कर्मचारी हा ब्रँन्ड अॅम्बॅसॅडर : मेधा जेरे
schedule20 Jul 24 person by visibility 342 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : कोणत्याही संस्थेचा, आस्थापनेचा चतुर्थश्रेणी कर्मचारी हा ब्रँन्ड अॅम्बॅसॅडर (सदिच्छादूत) असतो, ही बाब प्रत्येकाने लक्षात ठेवून सेवातत्पर राहायला हवे, असे मार्गदर्शन पुणे येथील लाइफ व सॉफ्ट स्कील प्रशिक्षक मेधा जेरे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे बँक ऑफ इंडिया अध्यासन, गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्र आणि कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यापीठात ‘नागरी सहकारी बँकांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमधील कार्यनैतिकता’ या विषयावर एकदिवसीय व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी प्रथम सत्रात श्रीमती जेरे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते.
श्रीमती जेरे यांनी अनेक वस्तुनिष्ठ व अनुभवातून आलेल्या उदाहरणांतून उपस्थित चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्याचे महत्त्व पटवून दिले. त्या म्हणाल्या, कर्मचारी कोणत्याही श्रेणीचा असला तरी त्याने आपल्या कामावर निर्व्याज आणि निस्वार्थ प्रेम केले पाहिजे. कर्मनिष्ठा ही महत्त्वाची मानली पाहिजे. आपले कामच आपल्याला समाजात ओळख प्राप्त करून देते. त्यामुळे काम करीत असताना ते कर्मचारी म्हणून कधीही करू नका तर संस्थेचे भागीदार म्हणून करा. आपण ग्राहकाला सेवा देण्यासाठी आहोत, हे तर खरेच; पण, त्या सेवेपलिकडे ग्राहक आपल्या आस्थापनेतून जाताना सोबत येथील अनुभव घेऊन जात असतो. विशेषतः बँकिंग क्षेत्रात येणाऱ्या ग्राहकाची पहिली भेट ही चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याशीच होते. त्यामुळे त्याला आपण मनापासून सेवा दिली, त्याच्याशी योग्य सुसंवाद साधला, तर तो कर्मचारी आणि त्याची संस्था या दोघांनाही ग्राहकाच्या हृदयात स्थान मिळते. त्या अर्थाने चतुर्थश्रेणी कर्मचारी हा संस्थेचा ब्रँन्ड अॅम्बॅसॅडर असतो, ही बाब या कर्मचाऱ्यांसह सर्वच घटकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी नवनवे ज्ञान आत्मसात करण्यास प्राधान्य द्यावे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान सामोरे असताना आपल्या कामाशी, ग्राहकांशी भावनिकदृष्ट्या नाते जोडावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, शिक्षणाचे उपयोजन आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये प्रभावी पद्धतीने कसे करावे, याचे मार्गदर्शन करण्यासाठी अशा प्रशिक्षण उपक्रमांची मोठी गरज आहे. आपल्या भोवतालाच्या आणि विशेषतः कार्यस्थळाच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या मनात आपुलकीची भावना आणि जाणीवा असणे फार महत्त्वाचे असते. एखादी संस्था केवळ आपल्याला नोकरी, पगार देत नाही, तर त्यासोबत एक सामाजिक प्रतिष्ठाही प्रदान करीत असते. ही प्रतिष्ठा जपण्याबरोबरच ती वृद्धिंगत करण्याची जबाबदारीही कर्मचाऱ्यांनी घेतली पाहिजे. आपल्या व्यक्तीगत प्रतिष्ठेसोबतच आपल्या संस्थेचा नावलौकिक वाढविण्यामध्ये कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते, हे डॉ. शिंदे यांनी उदाहरणे देत स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला अध्यासनाचे प्राध्यापक डॉ. राजन पडवळ यांनी स्वागत व परिचय करून दिला, तर कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागराळे यांनी प्रास्ताविक केले. दिवसभरात तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. नागरी सहकारी बँकांतील चतुर्थश्रेणी कर्मचारी मोठ्या संख्येने कार्यशाळेस उपस्थित होते.