वंचितांच्या जगण्याचा इतिहास सामोरा यावा ; प्रा. ज्ञानेंद्र पांडेय
schedule07 Jan 26 person by visibility 120 categoryशैक्षणिक
कोल्हापूर: वंचित, उपेक्षितांच्या जगण्याचा आणि अनुभवाचा इतिहास लिहीणे अत्यंत कठीण असते, पण तोच खरा दुर्लक्षित इतिहास आहे. तो सामोरा आणण्याचे काम नव्या पिढीतील इतिहास अभ्यासक, संशोधकांना करावयाचे आहे, असे प्रतिपादन अटलांटा (अमेरिका) येथील एमोरी विद्यापीठाचे प्रख्यात इतिहासतज्ज्ञ प्रा. ज्ञानेंद्र पांडेय यांनी केले.
शिवाजी विद्यापीठात सोमवारी (दि. ५) इतिहास, इंग्रजी, मराठी, हिंदी आणि विदेशी भाषा अधिविभागांच्या संयुक्त विद्यमाने ‘दुर्लक्षित इतिहास:
लपलेल्या इतिहासाची पुनर्प्राप्ती’ या विषयावर आयोजित विशेष शैक्षणिक व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर होते, तर डॉ. माया पंडित प्रमुख उपस्थित होत्या.
इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर क्रांतीची प्रक्रिया सतत कार्यरत असल्याचे सांगून प्रा. ज्ञानेंद्र पांडेय म्हणाले, समाज, राजकारण, संस्कृती आणि विचारप्रवाह यांमध्ये होणारे बदल हे क्रांतीचेच स्वरूप असून आजच्या काळातील डिजिटल क्रांतीने इतिहास लेखन व संशोधनाच्या पद्धतींमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणले आहेत. इतिहासामध्ये केवळ काही निवडक नेत्यांचाच नव्हे, तर सर्वसामान्य जनता, उपेक्षित वर्ग, स्त्रिया यांच्यासह विविध सामाजिक घटकांचाही सक्रिय सहभाग असतो. इतिहास लेखनात या घटकांचे योगदान अनेकदा दुर्लक्षित राहिल्याने इतिहासाचा समग्र आशय समोर येत नाही. भविष्यातील इतिहास मात्र केवळ मोठ्या लढायांचा किंवा नेत्यांचा नसावा. तो इतिहास अशा सर्वसामान्य, वंचित, उपेक्षित योगदानकर्त्याचा असावा आणि तो त्याच्या नजरेतून, अनुभवातून लिहीला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
स्त्रिया आणि कृष्णवर्णीय समाजाचा इतिहास मोठ्या प्रमाणावर 'अनार्काइव्हड' म्हणजेच अलिखित व दडपलेला राहिला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. या समाजघटकांचे अनुभव, स्मृती व संघर्ष इतिहासाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही आजच्या इतिहासकारांची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. प्रभंजन माने यांनी आभार मानले. यावेळी डॉ. गोपाळ गुरू, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. शरद नावरे, डॉ. शरद भुथाडिया यांच्यासह विविध अधिविभागांतील शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

