विद्यापीठाची ‘पेटंट गॅलरी’ ठरली लक्षवेधक
schedule20 Jan 26 person by visibility 79 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आजपासून सुरू झालेल्या दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय शिक्षण-उद्योग-शासन परिषदेमध्ये विशेष औद्योगिक प्रदर्शन आणि पोस्टर प्रदर्शन व स्पर्धेचे उद्घाटन दुपारी करण्यात आले. यामध्ये शिवाजी विद्यापीठाने गेल्या पाच वर्षांत प्राप्त केलेल्या बौद्धिक संपदा हक्क अर्थात पेटंटची गॅलरी सर्वाधिक लक्षवेधक ठरली.
विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात या प्रदर्शन-स्पर्धेचे दुपारी फीत कापून उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर डॉ. जाधव यांनी फिरून सर्व प्रदर्शनाची पाहणी केली. त्याचप्रमाणे सहभागी उद्योजक-व्यावसायिकांनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्याविषयी तसेच आवश्यक तेथे मार्गदर्शन व सहकार्य करण्याविषयी सूचित केले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत गतवर्षीप्रमाणे यंदाही अनेक स्थानिक उद्योजक, व्यावसायिक सहभागी झाले आहेत. यामध्ये अभिनव स्टार्टअपपासून ते प्रयोगशील उत्पादक, व्यावसायिक यांचा सहभाग राहिला. असे एकूण २० स्टॉल आहेत. सेंद्रिय, पर्यावरणपूरक पदार्थ, वस्तू आणि उत्पादने येथे प्रदर्शन, नोंदणी व विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये डॉ. गजानन राशिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठाच्या बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर) कक्षाच्या वतीने गेल्या पाच वर्षांत विद्यापीठाने प्राप्त केलेल्या विविध पेटंट प्रमाणपत्रांची गॅलरीही मांडण्यात आली आहे. ही प्रमाणपत्रे पाहण्यासाठी जिज्ञासू संशोधक विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली. ही गॅलरी अभिनव आणि दर्जेदार संशोधनासाठी प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास डॉ. राशिनकर यांनी व्यक्त केला. याखेरीज वीज बचत उपकरणे, औद्योगिक उपकरणे, सौर उपकरणे, आधुनिक लॉकर्स, कॉफी विथ सी.ए., स्टार्च थ्री-डी प्रिंटींग, सेंद्रिय खाद्यपदार्थ इत्यादींचेही स्टॉल आहेत.
पोस्टर प्रदर्शनात इंजिनिअरिंग व फॅब टेक, आय.टी. व इमर्जिंग टेक्नॉलॉजी, सोशिओ-मॅनेजमेंट व फिट-टेक, सस्टेनेबिलिटी व हेल्थ या चार गटांमध्ये सुमारे शंभर पोस्टर संशोधक विद्यार्थ्यांनी प्रदर्शित केले.
दरम्यान, परिषदेत आज दिवसभरात देशविदेशांतील तज्ज्ञांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर मांडणी केली. यामध्ये मलेशियाच्या टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे डॉ. मोहम्मद याझीद बिन याह्या, डॉ. अहमद इलियास बिन रुश्दान, ऑस्ट्रेलियाच्या साऊथवेल्स विद्यापीठाचे डॉ. महेश सूर्यवंशी, चितळे जिनस एबीएस इंडियाचे गिरीश चितळे, डी.वाय. पाटील वैद्यकीय विद्यापीठाचे डॉ. देवव्रत हर्षे, ‘सिरी’चे सहसंस्थापक सचिन कुंभोज, ग्लोबल फायनान्सचे संस्थापक संचालक योगेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.