लोकशाहीच्या व्यापक विस्तारात जी. डी. बापूंचे स्मरण आवश्यक : खोरे
schedule20 Jan 26 person by visibility 68 categoryसामाजिक
कोल्हापूर : सातारची प्रतिसरकार चळवळ ही आदर्श राजनीतीचे प्रतीक होते. या संपूर्ण चळवळीची प्रेरणा ही स्वातंत्र्याची आणि सामाजिक समतेची होती. साम्राज्यवादास पर्यायी व्यवस्था म्हणून ही चळवळ उभी राहिली. फिल्डमार्शल जी. डी. बापू लाड यातील एक प्रमुख होते. पर्यायी समाजाचे चित्र जी. डी. बापूंच्या जीवनदृष्टीत होते. या चळवळीला वैचारिक भूमी होती. न्यायदान व सावकारमुक्ती हे दोन महत्त्वाचे घटक होते. संघटनात्मक कार्याचे प्रारूप म्हणून याकडे नव्या अभ्यासकांनी पाहायला हवे. किंबहुना प्रतिसरकार चळवळीचे दस्तऐवजीकारण होणे गरजेचे आहे. आजच्या लोकशाहीच्या व्यापक विस्तारात जी. डी. बापूंचे स्मरण ठेवणे आवश्यक आहे. असे मत ज्येष्ठ संपादक अरुण खोरे यांनी व्यक्त केले. ते शिवाजी विद्यापीठातील ‘क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड अध्यासन’ आयोजित ‘प्रतिसरकारची चळवळ आणि जी. डी. बापू लाड’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे होते.
खोरे म्हणाले, भूमिगत चळवळ ही सामान्य माणसांचा आवाज होती. लोकशाहीचा विचार केंद्रस्थानी ठेवून ती राबवली जात होती. आता मात्र आजच्या स्थितिगतीने या कार्याचा विचार व्हायला हवा. त्यासाठी सामाजिक दुवे मांडणे गरजेचे आहे. या चळवळीमागे तत्कालीन महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास आणि संसदीय लोकशाहीचा संदर्भ आहे. कुलसचिव शिंदे म्हणाले, सामन्यातला सामान्य दोन घास सुखाने खावा या हेतुने प्रतिसरकारची चळवळ उभी राहिली. स्वराज्यातून सुराज्य हे या चळवळीचे स्वप्न होते. बापूंनी मराठवाडा मुक्ती संग्रामात महत्त्वाचे योगदान दिले. प्रतिसरकार चळवळीतील अनेक दुवे अजूनही दुर्लक्षित आहेत. त्यांचा अभ्यास होणे गरजेचा आहे.
मराठी विभागप्रमुख प्रा. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. विष्णू पावले यांनी आभार मानले. सूत्रसंचालन भक्ती नाईक यांनी केले. यावेळी प्रा. नंदकुमार मोरे, प्राचार्य आर. एस. डुबल, डॉ. नवनाथ गुंड, प्रा. भारती पाटील, प्रा. अवनीश पाटील, तसेच एम.ए.चे व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.