प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या ८ मे रोजी दुपारी १ वाजता; 'या' संकेतस्थळांवर पाहता येणार
schedule07 May 26 person by visibility 117 categoryशैक्षणिक
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवार ८ मे २०२६ रोजी जाहीर होणार आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी अधिकृत परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.
यंदा दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत पार पडली होती. राज्यभरातील ९ विभागीय मंडळांमधून (पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण) एकूण १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हा निकाल आठ दिवस लवकर लागत आहे.
विद्यार्थ्यांना खालील अधिकृत संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल:
* mahresult.nic.in
* sscresult.mkcl.org
* sscresult.mahahsscboard.in
या निकालासोबतच विद्यार्थ्यांना विषयानुसार गुण पाहता येणार असून, गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.