अटल सेतूच्या मुख्य भागावर कोणतेही तडे नाहीत
schedule21 Jun 24 person by visibility 470 categoryराज्य
मुंबई : अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूच्या मुख्य भागावर कोणतेही तडे गेले नसून अटल सेतूला जोडणाऱ्या पोहोच मार्गावर किरकोळ भेगा आढळून आल्या आहेत. हा पोहाच मार्ग मुख्य पुलाचा भाग नसून तो पुलाला जोडणारा सेवा रस्ता आहे. तसेच उत्पन्न झालेल्या भेगा या प्रकल्पातील संरचनात्मक दोषांमुळे नाहीत. त्यामुळे पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नसल्याचे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे स्पष्टीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) देण्यात आले आहे.
प्रकल्पाच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्स टीमने 20 जून 2024 रोजी केलेल्या तपासणीदरम्यान, उलवेकडून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या रॅम्प क्रमांक 5 अस्फाल्टवर तीन ठिकाणी किरकोळ भेगा निदर्शनास आल्या आहेत. या भेगा त्वरीत दुरूस्त करण्यासारख्या आहेत.
अटल सेतू प्रकल्पाच्या पॅकेज 4 चा कंत्राटदार, मेसर्स स्ट्रॅबॅग या कंपनीने सदर भागातील दुरुस्तीचे काम सुरू केले असून सेतूवरील वाहतुकीला कोणताही अडथळा न होऊ देता 24 तासांत हे काम पूर्ण केले जाणार असल्याचेही एमएमआरडीएमार्फत कळविण्यात आले आहे.