राज्यस्तरीय आरोग्य मानांकनात कोल्हापूर महापालिकेला प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड
schedule12 May 26 person by visibility 113 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका राज्यस्तरीय आरोग्य मानांकनामध्ये तिसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर यावी, यासाठी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने प्रयत्न करणे आवश्यक असल्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या.
महापालिकेच्या हॉस्पिटल व नागरी आरोग्य केंद्रांतील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक आज सकाळी ११ वाजता आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
बैठकीच्या प्रारंभी उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांनी आरोग्य विभागाच्या वतीने आयुक्तांचे पुस्तक देऊन स्वागत केले. त्यानंतर आयसोलेशन प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय स्तरासाठी पात्र ठरल्याबद्दल डॉ. अर्पिता खैरमोडे यांचा आयुक्तांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पंचगंगा हॉस्पिटलचे कामकाज उत्कृष्टरीत्या सुरू असल्याबद्दल प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या काळे-हेरवाडे यांचाही सत्कार करण्यात आला. यानंतर आरसीएच अधिकारी डॉ. अमोल माने यांनी स्लाईड शोद्वारे महापालिकेच्या आरोग्य सेवेची माहिती सादर केली.
यावेळी बोलताना आयुक्त डॉ. भारुड यांनी सर्व आरोग्य केंद्रे स्वच्छ, सुस्थितीत व नीटनेटकी ठेवण्याच्या सूचना दिल्या. कुटुंब कल्याण कार्यक्रम, नियमित लसीकरण तसेच इतर आरोग्य योजनांचा नियमित आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आयसोलेशन प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राला मिळालेल्या मानांकनाच्या धरतीवर इतर केंद्रांनाही असेच मानांकन मिळावे, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. महापालिकेची ब्लड बँक व ऑक्सिजन प्लांट नामांकित व अनुभवी खासगी संस्थेमार्फत सीएसआरच्या माध्यमातून चालविण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांना देण्यात आल्या.
या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, सिव्हिल सर्जन प्रतिनिधी डॉ. रेश्मा पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे, एड्स नियंत्रण कार्यक्रम अधिकारी दिपा शिपुरकर तसेच प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. संजना बागडी, डॉ. योगिता भिसे व अन्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.