कोल्हापूर महानगरपालिका : जवाहरनगर, सिरत मोहल्ला येथील विनापरवाना दोन मजल्यांचे आर.सी.सी. स्लॅब व कॉलमचे बांधकाम जमीनदोस्त
schedule29 Jan 25 person by visibility 344 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : जवाहर नगर, सिरत मोहल्ला येथील सि.स.न.२८४५/बी प्लॉट नं.२० या मिळकतीमध्ये नासिर अब्दुलशकुर कच्छी यांनी विना परवाना बांधकाम सुरु केल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी १०,०० मीटर X १८.५० मीटरचे विनापरवाना आर.सी.सी. इमारतीचे बांधकाम केले आहे. त्यामुळे कच्छी यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ (१) अंतर्गत दि.७ ऑक्टोंबर २०२४ रोजी विनापरवाना बांधकाम काढून घेण्याकरीता नोटीस देण्यात आली होती.
नासिर अब्दुलशकुर कच्छी यांनी विनापरवाना बांधकाम काढून न घेतल्याने दि.२ डिसेंबर २०२४ रोजी त्यांचेवर राजारामपुरी पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी नगररचना विभाग, विभागीय कार्यालय क्र.१ गांधी मैदान व विद्युत विभाग यांनी संयुक्त मोहिमेमध्ये व पोलिस बंदोबस्तात विनापरवाना बांधकामापैकी दोन मजल्यांची आर.सी.सी. स्लॅब व कॉलमसह बांधकाम पाडण्यात आले. उर्वरीत बांधकामापैकी नियमबाहय बांधकाम स्वत:हून काढून घेत असल्याबाबत व नियमानुसार असलेल्या बांधकामाची महानगरपालिकेची परवानगी घेवूनच पुढील बांधकाम करू असे नासिर अब्दुलशकुर कच्छी यांनी लेखी महापालिकेस लिहून दिले आहे. त्यामुळे सदरची कारवाई थांबविण्यात आली.
ही कारवाई सहा.संचालक नगररचना विनय झगडे व उपशहर रचनाकार रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, सुनिल भाईक, चेतन आरमाळ व पवडी, विद्युत स्टोअर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने केली.