ई-कन्टेन्ट निर्मितीत आवाज व व्यक्तिमत्त्व महत्त्वाचे : तुषार भद्रे
schedule21 Jan 26 person by visibility 56 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : आजच्या बदलत्या जीवनशैलीत केवळ तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणे पुरेसे नसून चांगला माणूस असणे हेच सर्वांत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी व उच्चारशास्त्र तज्ज्ञ तुषार भद्रे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने पीएम-उषा योजनेंतर्गत विविध विद्याशाखांच्या अध्यापन व अध्ययनासाठी “इंटरॲक्टिव्ह ई-कन्टेन्ट विकसन” या विषयावर आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेतील पहिल्या सत्रात ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे पीएम-उषा योजनेचे नोडल अधिकारी प्रा. डॉ. गोविंद कोळेकर उपस्थित होते. यावेळी महावीर महाविद्यालयाचे सहा. प्राध्यापक डॉ. बाळगोंड पाटील, उपकुलसचिव विनय शिंदे, सहा. कुलसचिव दिलीप मोहाडीकर, समन्वयक डॉ. चांगदेव बंडगर तसेच शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भद्रे पुढे म्हणाले की, ज्यांचा आतला आवाज प्रामाणिक असतो, त्यांचा बाहेरचा आवाजही प्रभावी असतो. जीवनात कोणतेही तंत्र वापरले तरी त्यामागील परफॉर्मन्स आणि भावनिक प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो. श्वास आणि आवाज हे माणसाच्या जीवनाचे केंद्रबिंदू आहेत. स्वतःच्या आवाजावर प्रेम करणे, स्वतःची ओळख निर्माण करणे आणि कोणते विचार स्वीकारायचे व कोणते नाकारायचे हे ठरविणे आवश्यक आहे.
दुःख आणि आनंद या दोन्ही भावना समजून घेत जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगायला हवा. भावनेची भाषा समजणे ही माणूस म्हणून आपली मूलभूत गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतात प्रा. डॉ. गोविंद कोळेकर म्हणाले की, पीएम-उषा योजनेच्या माध्यमातून शिक्षकांना गुणवत्तापूर्ण ई-कन्टेन्ट निर्मितीसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावी व सुसंगत शिक्षण पोहोचविणे शक्य होत असून या कार्यात दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.
कार्यशाळेची भूमिका स्पष्ट करताना संचालक डॉ. कृष्णा पाटील म्हणाले की, ई-कन्टेन्ट निर्मितीत आवाज हा केवळ तांत्रिक घटक नसून तो शिकण्याचा अनुभव समृद्ध करणारा माध्यम आहे. विद्यार्थ्यांपर्यंत परिणामकारक शिक्षण पोहोचविण्यासाठी स्पष्ट, भावपूर्ण आणि शुद्ध आवाजातील ई-कन्टेन्ट आवश्यक असल्यानेच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. नितीन रणदिवे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नगीना माळी यांनी केले, तर पाहुण्यांची ओळख श्रीमती प्रियांका सुर्वे यांनी करून दिली. आभार उपकुलसचिव श्री. विनय शिंदे यांनी मानले.