+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात : समीर देशपांडे; करवीर नगर वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त
schedule15 May 24 person by visibility 406 categoryसामाजिक
▪️१५ मे :राष्ट्रीय वृक्ष दिनाच्या निमित्ताने..

जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणजे भागवत सांप्रदायाच्या मंदिराचा कळस. संत तुकाराम हे संवेदनशील भावकवी होते. त्यांच्या रचना म्हणजे उत्कट अनुभूतीचा साक्षात्कार आहे.ते जसे जगले तसे ते त्यांच्या वाणीतून व्यक्त होत होते.त्यांच्या मनातील भावना आपोआप पोटातून ओठांवर आल्या. संसारात राहून परमार्थ साधता येतो असे सांगणाऱ्या या कृतिशील महान साक्षात्कारी संताने वृक्षाचे महत्त्व अत्यंत आत्मियतेने व तळमळीने सांगितले आहे, ते म्हणतात..

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे/ पक्षीही सुस्वरे आळविती /येणे सुखे रुचे एकांताचा वास/ नाही गुणदोष अंगा येत//
    वृक्षवल्ली, वनचरे तसेच सुस्वर कंठाने आळविणारे पक्षी हे आमचे सगे - सोयरे, गण -गोत आहेत. त्यांच्या सोबत एकांतात रहात असताना माणूस प्रसन्न, निर्भय व निष्कलंक होतो. कारण वृक्ष,लता, वेली त्यांच्या समवेत असणारे असंख्य पक्षी, यांच्या सहवासात रहात असताना अंगी कोणतेही गुणदोष लागत नाहीत. आकाशाचा मंडप आणि पृथ्वीचे आसन असणाऱ्या मुक्त वातावरणात प्रत्येक मनुष्याला आनंद, आणि प्रसन्नता लाभते, त्यांच मन रमून जात.
तुका म्हणे होय मनासि संवाद/
आपुलाची वाद आपणासि//
अर्थात वृक्षाच्या सानिध्यात राहून त्याचे गुण आपल्या अंगी बाणायला लागतात. आपण उन्हात तळपत राहून वृक्ष पांथस्थांना सावली देतात, सृष्टीतील पर्यावरणाचे रक्षण करतात, मानवाला औषधी गुणधर्माची फळे,पाने,फुले, देतात, घरादाराला लाकूड पुरवतात, जळणासाठी तसेच डिंक, कागद निर्मितीसाठी सहाय्यभूत होतात.अर्थात आपलं सर्वस्व समर्पित करून संसार तापाने तापलेल्या जीवाला सुखाची, समाधानाची,व आरोग्यदायी सावली देणारा वृक्ष हा खरोखरच सत्पुरुष आहे, असे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ते आजच्या काळातही तंतोतंत लागू पडते.

आज जगभरात आधुनिकीकरण व विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे, त्याचे दुष्परिणाम अत्यंत भयानक व भयावह असून मानवी जीवनात अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. ग्लोबल वाॅर्मिंग सारखी समस्या जगाच्या अर्थात मानवाच्या अस्तित्वावरच घाला घालते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वृक्षाचे महत्त्व चारशे वर्षांपूर्वी सांगितले आहे, यांत त्यांचा दूरदृष्टीपणा व मानवी जीवनाविषयीचा कळवळा दिसून येतो, संतोक्तीप्रमाणे जास्तीत जास्त वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकांनी कंबर कसली पाहिजे...!!.

✍️ डाॅ. सुनीलकुमार सरनाईक.

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)