पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचा मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम
schedule03 Dec 25 person by visibility 53 categoryराज्य
◼️प्रारुप मतदार यादीनुसार दोन लाख ७२ हजार पदवीधरांची व ४४ हजार शिक्षकांची नावनोंदणी
पुणे : पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या नव्याने मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीनुसार पुणे विभागात २ लाख ७२ हजार ६१ पदवीधरांची तर ४४ हजार २३३ मतदारांची नोंदणी झाली आहे.
या २०२५ च्या कार्यक्रमांतर्गत प्रारुप मतदार यादीनुसार पदवीधर मतदार संघासाठी पुणे जिल्ह्यात ५४ हजार ८१० मतदार नोंदणी, सातारा-३५ हजार ८७९, सोलापूर- ३० हजार ४७२, कोल्हापूर- ८० हजार १८०, सांगली- ७० हजार ७२० अशी एकूण २ लाख ७२ हजार ६१ इतकी नोंदणी झाली आहे. तर शिक्षक मतदार संघासाठी पुणे- ९ हजार ७७८, सातारा- ८ हजार ४९२, सोलापूर- ११ हजार १९८, कोल्हापूर ८ हजार ६३१ व सांगली- ६ हजार १३४ अशी एकूण ४४ हजार २३३ मतदारांची नोंदणी झाली आहे.
२०२० मध्ये पदवीधर मतदार संघासाठी ४ लाख २० हजार ८९६ इतकी तर शिक्षक मतदारांची ७२ हजार १९० इतकी नोंदणी होती. गेल्या निवडणुकीपेक्षा यावर्षी आतापर्यंत कमी मतदार नोंदणी झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मतदार नोंदणीची प्रसिद्धी व जागृती करुन जास्तीत जास्त पात्र मतदारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.
▪️मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम:
या कार्यक्रमांतर्गत १८ डिसेंबर २०२५ पर्यंत मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या पदनिर्देशित अधिकारी किंवा संबंधित विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे दावे व हरकती दाखल करता येतील. नवीन नाव नोंदणीचा दावा दाखल करण्यासाठी पदवीधरांना नमुना क्रमांक १८ व शिक्षकांना नमुना क्रमांक १९ द्वारे याच कालावधीत दावा दाखल करता येईल. प्रारुप मतदार यादीतील नावांबाबत आक्षेप असल्यास नमुना क्रमांक ७ व यादीतील नोंदीमध्ये दुरुस्तीसाठी नमुना क्रमांक ८ दाखल करता येईल.
दावे व हरकतींचा कालावधी संपल्यानंतर ५ जानेवारी २०२६ रोजी दावे व हरकती निकाली काढून पुरवणी यादी तयार करणे व छपाईची कार्यवाही करण्यात येईल. पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या यादीची अंतिम प्रसिद्धी १२ जानेवारी २०२६ रोजी केली जाणार आहे.