लढणार्यांना पाठबळ द्या : रमेश गावस; विद्यापीठात पर्यावरण आणि प्रसारमाध्यमे विषयावर कार्यशाळा
schedule31 Jan 26 person by visibility 114 categoryसामाजिक
कोल्हापूर : पर्यावरणाचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असले तरी देशात पर्यावरणाचे लढे उभे राहताना दिसत नाही. देशातील वातावरण अशा लढ्यांसाठी पोषक उरले नाही. तरीही काहीजण नेटाने लढत आहेत. त्यांना पाठबळ मिळावे, अशी अपेक्षा गोव्यातील पर्यावरणाचे गाढे अभ्यासक रमेश गावस यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात पर्यावरणीय लढे या विषयावर ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे, पर्यावरण अभ्यासक शरद आजगेकर, विनायक देसाई व्यासपीठावर उपस्थित होते.
गावस म्हणाले, पर्यावरणाचे लढे सापेक्ष आहेत. हे लढे उभारण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्न करावे लागतील. लढणार्या लोकांना पाठबळ द्यावे लागेल. कायदा आणि बुद्धीचातुर्यातून लढ्यांची व्यापक आखणी करावी लागेल. पर्यावरण जोपर्यंत आत्मिक जीवनाशी जोडले जाणार नाहीत, तोवर पर्यावरणाचे लढे यशस्वी होणार नाहीत.
सर्वसामान्य लोकांना पर्यावरण हा विषय क्लिष्ट वाटतो. तो सोप्या शब्दांत सांगावा लागेल. त्यांची संवेदनशीलता वाढविण्यासाठी जाणीपूर्वक प्रयत्न करावे लागतील. परिस्थिती कशीही असली तरी व्यवस्थेच्या विरोधात उभे राहण्याची हिंमत लोकांमध्ये निर्माण करावी लागेल. विविध पातळ्यांवर हे लढे लढावे लागतील तरच पर्यावरणाचे प्रश्न व्यवस्थेच्या केंद्रस्थानी येतील, असे गावस म्हणाले.
दुसर्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे म्हणाले, देशात अनेक स्मार्ट सिटी होत आहेत. परंतु त्या स्मार्ट करण्याच्या नादात पर्यावरणाचा बळी दिला जात आहे. हिमालयाचा र्हास होत आहे. नद्या आणि समुद्राचे प्रदूषण वाढत आहे. पर्यावरणामुळे मानवी आरोग्य धोक्यात आहे परंतु पर्यावरणाचे प्रश्न माध्यमांतून हद्दपार होत आहेत. जगभर तंत्रज्ञानाच्या विकासाची गती खूप आहे. हे तंत्रज्ञान आणि मानव यांच्यात सेतू तयार करावा लागेल. धोरण निश्चितीच्या पातळीवर पर्यावरणाला अग्रक्रम द्यावा लागेल. यासाठी पत्रकारांवर मोठी जबाबदारी आहे. पर्यायी माध्यमांचा वापर करुन पर्यावरणाच्या प्रश्नांकडे व्यवस्थेचे लक्ष वेधण्यासाठी सर्वांनीच घेतला पाहिजे.
किर्लोस्कर ऑईल इंजिन आणि लक्ष्मी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. प्रास्ताविक मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. सूत्रसंचालन तेजश्री शिंदे तर आभार जयप्रकाश पाटील यांनी मानले. यावेळी पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे माजी प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित, डॉ. अनमोल कोठाडिया, सुधाकर निर्मळे, डॉ. सुमेधा साळुंखे, शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयातील शिक्षक, पत्रकार आणि विद्यार्थी उपस्थित होते.