डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मध्ये " इंजिनिअर्स डे " उत्साहात
schedule15 Sep 25 person by visibility 108 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये 15 सप्टेंबर रोजी ' इंजिनिअर्स डे ' (अभियंता दिन) विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. हा दिवस सुप्रसिद्ध अभियंता भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा केला जातो. सर विश्वेश्वरैया यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले. दीपप्रज्वलानाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
माहिती तंत्रज्ञान, डिजिटल इकॉनॉमी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभियंते आणि सिस्को (बेंगलोर) येथे कार्यरत सुबोध गाजरे यांचे विशेष व्याख्यान यावेळी आयोजित करण्यात आले. ' ट्रेंड्स शेपिंग द डिजिटल इकॉनॉमी अँड हाऊ डू आय बिल्ड माय करियर अराउंड इट ' या विषयावर विविध पैलूंनी मांडणी करताना त्यांनी आगामी काळामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये होत असणारे बदल आणि डिजिटलायझेशनचा त्यावरील प्रभाव यावर प्रकाशझोत टाकला. गाजरे म्हणाले, " उद्योग , व्यापार, शिक्षण सर्व क्षेत्रांमध्ये 'एआय'चा वापर होत असल्याने स्टार्टअप आणि संशोधन यांच्यासाठी प्रचंड संधी उपलब्ध झाली आहे. इंटरनेट ऑफ थिंग्स तंत्रज्ञानामुळे उद्योग क्षेत्राची संरचना बदलत आहे. डेटा अनालिटिक्समुळे उद्योग वृद्धीसाठी मोठे सहाय्य होत आहे. एआय आधारित सेवांमुळे आर्थिक विकासाला चालना मिळाली आहे.
विद्यार्थ्यांनी आत्मविकासाच्या प्रक्रियेसाठी कृतीशील राहावे. शाश्वत विकासासाठी संवाद आणि सहयोग अनिवार्य आहेत" .श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये कौशल्य विकास या मुद्द्यावर भर देताना, " आजचा अभियंता केवळ तांत्रिक ज्ञानाने परिपूर्ण असून पुरेसे नाही, तर सॉफ्ट स्किल्स आणि लाईफ स्किल्स यांचा संगम अभियंत्यामध्ये असावा लागतो. शैक्षणिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये प्रासंगिक राहण्यासाठी 'अप- स्किलिंग आणि रि- स्किलिंग ' करणे अनिवार्य झाले आहे.
भारतामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि करिअर संधी निर्माण करण्यासाठी ' स्किल- रेडी ' अभियंते बहुसंख्येने निर्माण होणे गरजेचे आहे" असे प्रतिपादन केले. संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाचे प्रयोजन आणि अभियंता दिनाचे महत्त्व विशद केले, तसेच विश्वेश्वरैया यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी आभार मानताना विशेष व्याख्यानातील प्रमुख मुद्द्यांना पुनश्च अधोरेखित केले.
इन्स्टिट्यूटमधील विविध विभागांनी स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यामुळे प्रोजेक्ट प्रदर्शन, तांत्रिक प्रश्नमंजुषा, मॉडेल बनविणे, आर्ट बॅटल, ई- फुटबॉल , ट्रेजर हंट, इलेक्ट्रो पझल, पॉवर किक, वादविवाद स्पर्धा, हॉलीवुड रश, फ्री फायर , बीजीएमआय, कॅड बस्टर, कोडिंग स्पर्धा आणि पोस्टर सादरीकरण या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली सर्जनशीलता, तांत्रिक ज्ञान आणि टीमवर्क दाखविण्याची संधी मिळाली. मेकॅनिकल, सिव्हिल , इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील स्टुडन्ट असोसिएशन्सनी उस्फूर्तपणे सर्व स्पर्धांचे आयोजन करून यशस्वीपणे संचालन केले. सर्व विभागप्रमुखांचे आणि समन्वयकांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. या स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध शाखांची माहिती मिळालीच, तसेच आत्मविश्वास वाढल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहून समाजाच्या प्रगतीत योगदान देण्याचा संकल्प केला. अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये होत असलेले बदल याविषयी विद्यार्थी आणि तज्ञ यांच्यामध्ये विचारमंथन झाले. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध शोध, संरचना, मशीन्स, डिझाइन्स दर्शविणारे फलक यावेळी प्रदर्शित करण्यात आले.
संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे सर्व उपक्रमांसाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. समन्वयक प्रा. सकिना भोरी आणि प्रा. अमृता काटे यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले.