पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत ७५ सायकलपटूंची ७५ किलोमीटर सायकल रॅली
schedule09 Nov 25 person by visibility 89 categoryसामाजिक
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत, आज ७५ सायकलपटूंनी ७५ किलोमीटर सायकल रॅली काढली. कोल्हापुरातील सायकलपटूंनी कोल्हापूर ते निपाणी आणि परत कोल्हापूर अशी ७५ किलोमीटरची सायकल फेरी काढून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनोख्या पध्दतीने मानवंदना दिली. या सायकल फेरीत सहभागी झालेल्या सर्व सायकलपटूंना, खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त २१ सप्टेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत, खासदार क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आलाय. फिट युवा फॉर विकसित भारत, असे ब्रीद वाक्य घेऊन, देशातील सर्व जिल्ह्यांत हा क्रीडा महोत्सव होत आहे. कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने क्रीडा महोत्सवांतर्गत विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज सायकल रॅलीचे आयोजन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस असल्याने, ७५ सायकलपटूंनी ७५ किलोमीटर सायकलफेरीचे आयोजन केले होते. आज सकाळी ७ वाजता कोल्हापुरातील ताराराणी चौकाजवळून या रॅलीला सुरवात झाली. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सायकल फेरीचा शुभारंभ झाला. ताराराणी चौक, शिवाजी विद्यापीठ, गोकुळ शिरगाव मार्गे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरुन ही रॅली निपाणीकडे रवाना झाली. या रॅलीत ६ वर्षांपासून ७६ वर्षांपर्यंतच्या सायकलपटूंचा सहभाग होता. निपाणी इथल्या हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली. या ठिकाणी कारखान्याचे अध्यक्ष एम. पी. पाटील, उपाध्यक्ष पवनकुमार पाटील यांच्या हस्ते सायकलपटूंचा सत्कार झाला. यावेळी हालसिध्दनाथ कारखान्याचे संचालक प्रकाश शिंदे, जयवंत भाटले, राजेंद्र गुंदेशा, रावसाहेब फराळे, सुहास गुगे, सुनील पाटील, रामगोंडा चौगुले, भरत नसलापुरे, व्यवस्थापकीय संचालक आप्पासाहेब शिरगावे उपस्थित होते. ७५ किलोमीटरचे अंतर पूर्ण करुन ही सायकल रॅली पुन्हा कोल्हापुरात आली. दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात रॅलीत सहभागी झालेल्या सर्व ७५ सायकलपटूंचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदके तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोल्हापुरातील सायकलपटूंनी अनोख्या पध्दतीने मानवंदना दिल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असून, कोल्हापूर जिल्ह्यातील युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिक त्यातून प्रेरणा घेऊन फिटनेस वाढवतील, अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली.
सायकल वेडे कोल्हापूर या ग्रुपचे अध्यक्ष राम कारंडे, पांडुरंग माळी, जयदीप पाटील, अंकुश पाटील, इंद्रजित बागल, विवेक शिंदे यांनी या ७५ किलोमीटरच्या सायकल रॅलीचे संयोजन केले. या रॅलीसाठी खासदार क्रीडा महोत्सवाचे समन्वयक उमेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.