क्रीडा संकुलासाठी शेंडा पार्कातील २५ एकर जागा द्या; आ. सतेज पाटील यांची क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्याकडे मागणी
schedule09 Nov 25 person by visibility 100 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यासाठी कृषी विभागाची शेंडा पार्क येथील २५ एकर जागा उपलब्ध करावी, अशी मगाणी आ. सतेज पाटील यांनी केली आहे. हे निवेदन क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे व कृषिमंत्री दत्ता भरणे यांना दिले आहे.
कोल्हापूर जिल्ह्याची 'क्रीडानगरी' म्हणून देशभरात ओळख आहे. येथील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. जिल्ह्यातील सर्वसाधारण तसेच दिव्यांग खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल उभारणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मी पालकमंत्री असताना २०२२ मध्ये शेंडा पार्क परिसरातील कृषी विभागाची सुमारे २५ एकर जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केला होता; परंतु शेंडा पार्क येथील निश्चित केलेली जागा सध्या इतर शासकीय विभागांना दिल्याने जिल्हा क्रीडा संकुलासाठी योग्य जागेचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.
शेंडा पार्क परिसराचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ५३७ एकर असून, त्यापैकी २१७ एकर जागा ४० हून अधिक शासकीय कार्यालयांसाठी राखीव ठेवली आहे; मात्र यामध्ये क्रीडा विभागासाठी जागा दिलेली नाही. जिल्हा प्रशासनाने शेंडा पार्कऐवजी मोरेवाडी परिसरातील भूखंड सुचवला आहे; परंतु या पर्यायी भूखंडाच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने तो पूर्णत: गैरसोयीचा आहे. शेंडा पार्क परिसर शहराजवळ असल्याने खेळाडूंना सोयीस्कर आहे, अशी मागणी करण्यात आली आहे.