योग्य आणि अयोग्य हेच यशस्वी जीवनाचे परिमाण असावे : संदीप वासलेकर; केआयटी च्या ‘अभिग्यान’ व्याख्यानमालेस ८००विद्यार्थ्यांची उपस्थिती
schedule09 Nov 25 person by visibility 135 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त प्रदत्त) महाविद्यालयाच्या वॉक विथ द वर्ल्ड या विद्यार्थी व्यासपीठाच्या माध्यमातून आज ९ नोव्हेंबर २५ रोजी अभिग्यान-२५ ही आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषद कोल्हापुरातील सायबर येथील आनद भवन येथे संपन्न झाली.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक,अनेक देशांचे सल्लागार म्हणून काम केलेले श्री संदीप वासलेकर यांनी जगभरातील चाललेल्या बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींबाबत भाष्य केले. वेगवेगळ्या विषयात जगभर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण क्लिष्ट प्रश्नांची सोडवणूक कशी करू शकतो याबाबतही त्यांनी काही उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर ठेवली. भारतीय तत्त्वज्ञान, निष्काम कर्मयोग, वसुधैव कुटुंबकम, आत्म र्शन आणि दूरदृष्टी या पंचसूत्रीच्या आधारे आपण जगातील कोणत्याही समस्येचे उत्तम निर्वाहन करू शकतो असे सांगितले. यश अपयश हे यशस्वी आयुष्याचे परिमाण नाही त्या ऐवजी योग्य आणि अयोग्य हेच यशस्वी जीवनाचे परिमाण आहे असे त्यांनी आग्रहाने मत व्यक्त केले.
दुसऱ्या सत्रामध्ये क्विक हिल या कंपनीचे निर्माते उद्योजक संजय काटकर यांनी आपला उद्योजकीय प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. रिव्हर्स इंजीनियरिंग व प्रॅक्टिकल अनुभव तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चाललेल्या विविध संगणकीय क्षेत्रातील विकासाच्या विषयात विद्यार्थ्यांनी जागृत राहून कार्य केले पाहिजे असा आग्रह केला.
पत्रकारिता क्षेत्रातील तरुण चेहरा विलास बढे यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलेच तसेच काही विषयात गांभीर्याने विचार करायला भाग पाडले. आयुष्याची कमाई मिळवलेला पैसा, मिळालेले फॉलोवर्स, मिळालेले लाइक्स नसून नाती, प्रेम, जोडलेली माणसं आणि देशाच्या विकासासाठी केलेले योगदान हेच आहे असे त्यांनी आग्रहाने मत व्यक्त केले. तीस वर्षे केलेल्या कष्टाची तुलना 30 सेकंदाच्या रिल्स बरोबर करणे हे अयोग्यच आहे हे त्यांचे वाक्य विद्यार्थ्यांना भावले. कबड्डीच्या खेळाप्रमाणे अंतिम श्वासापर्यंत हार न मानणे, प्रतिस्पर्धी व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून तिथून बाहेर पडण्याचे धाडस करणे हे जसे कबड्डी शिकवते. तसेच या आयुष्याला आपण कबड्डी प्रमाणे सामोरे गेले पाहिजे असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
बदलते तंत्र आणि त्यातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स ची भूमिका या विषयावर अत्यंत वेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत व उदाहरणांनी रंगत आणली ती चौथ्या सेशनने वक्ते होते श्री चिन्मय गव्हाणकर. जेव्हा जेव्हा तंत्रज्ञान बदलते तेव्हा स्वाभाविक सुरुवातीला त्याची भीती असते त्याच्याबद्दल गैरसमज असतात पण हळूहळू हे सगळे गैरसमज बाजूला होऊन यातून मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होते. AI तंत्रद्यान व त्याची उपयोगिता या नवीन पिढीला नक्कीच होणार आहे असे मार्गदर्शन त्यांनी उपस्थितांना केले. प्रत्यक्षामध्ये ए.आय हे एक टूल असून याच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी लवकरात लवकर साध्य करून पूर्णत्वाला नेऊ शकतो असा स्वअनुभव त्यांनी उपस्थितांना सांगितला.
अभिनय क्षेत्रातील तरुण चेहरा अभिनय बेर्डे यांची मुलाखत पाचव्या सेशनमध्ये घेण्यात आली. अत्यंत मनमोकळ्या पद्धतीने झालेल्या या संवादात अभिनयने आपला प्रवास या प्रवासातील चढ उतार या प्रवासात विविध लोकांनी केलेले सहकार्य मार्गदर्शन याबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. अभिनय क्षेत्रात जर काम करायचे असेल तर आपली अभिनयातील बाजू ही भक्कम असली पाहिजे तरच लोक तुम्हाला काम देतात असे प्रांजळ मग व्यक्त केले. स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येकाने आपले काम प्रिसाइज पद्धतीने केले पाहिजे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
अंतिमतः जे सत्र होते ते होते भारतीय संरक्षण दलाचे निवृत्त लेफ्टनंट जनरल श्री सुदर्शन हसबनीस यांचे. अत्यंत साध्या सोप्या भाषेत त्यांनी संरक्षण दले व त्यातील अभियंत्यांची भूमिका याबाबत आपले अनुभव मांडले. भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांमध्ये विविध पातळीवर प्रत्येक ठिकाणी अभियंत्यांची कामगिरी सर्वोच्च झाली तरच या दलांची अंतिम ध्येय पूर्ण होत असतात या गोष्टीला त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्य दलामध्ये सहभागी होऊन आपले अभियांत्रिकी कौशल्य देश संरक्षणासाठी वापरावे अशा प्रकारचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
दिवसभराच्या या विविध पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, विश्वस्त सुनील कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संचालक डॉ मोहन वनरोट्टी, रजिस्टर डॉ.दत्तात्रेय साठे सर्व विभाग प्रमुख, अधिष्ठाता, प्राध्यापक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत आदित्य साळुंखे व समीक्षा बुधले यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रमोद पाटील यांनी केले कार्यक्रमाचे सांगता वंदे मातरम ने झाली या कार्यक्रमासाठी कोल्हापूर परिसरातील सुमारे आठशे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.