+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule10 Oct 24 person by visibility 302 categoryदेश
मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज (गुरुवार १० ऑक्टोबर) एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे.

रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.

रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

▪️जगाने अनमोल रत्न गमावले;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना श्रद्धांजली
मुंबई : निखळ मानवता, सच्चे राष्ट्रप्रेम आणि उच्च कोटीची उद्योजकता यांचा दुर्मीळ मिलाफ असलेले अमुल्य असे रत्न म्हणता येईल असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनामुळे जगाने गमावले आहे. भारतीयांच्या मनातील अढळ मानबिंदू अस्ताला जाणे धक्कादायक आहे, अशी शोकमग्न प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पद्मविभूषण रतन टाटा आपल्या कर्तृत्वाने अजरामरच राहतील. पण त्यांचे अस्तित्व हे आधुनिक भारतीय उद्योग जगतासाठी आधारवड ठरले होते, असे नमूद करून मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, टाटा या नावावरील विश्वास रतन टाटा यांनी आणखी दृढ केला.

टाटा परिवाराचे आणि मुंबईचे नाते अतूट राहीले आहे. रतन टाटा यांनी मुंबईवरही भरभरून प्रेम केले. मुंबईसाठी ते नेहमीच भरीव योगदान देत आले आहेत. महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक, लोक कल्याणकारी उपक्रमाला ते नेहमीच पाठबळ देत आले आहेत. रतन टाटा यांच्याकडे उद्योजकतेची विशाल दृष्टी होती. त्यातही मानवता हा केंद्रबिंदू होता, हे त्यांच्याशी संवाद साधताना लक्षात येत राहायचे. मीठापासून ते विमानापर्यंतचा उद्योग, व्यवसाय करताना रतन टाटा यांनी मातीशी, मानवतेशी असलेल्या नात्यात कधीही अंतर येऊ दिले नाही. त्यांच्या नावाप्रमाणेच जगाने एक अमुल्य असे रत्न गमावले आहे.रतन टाटा हे नाव संपूर्ण देशाला सकारात्मक ऊर्जा देणारे, बळ देणारे होते. ते उद्योग विश्वाचे शिरोमणी होते. उद्योजकांच्या पिढ्यांना त्यांनी दीपस्तंभासारखे मार्गदर्शन केले. सामाजिक उत्तरदायित्व म्हणजे काय याचे रतन टाटा हे सर्वोत्तम उदाहरण होते.

भारतासाठी आणि साहजिकच महाराष्ट्रासाठी ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांचे निधन अपरिमित अशी हानी आहे. अशा या महान भारत सुपुत्राला महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री या नात्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दिवंगत टाटा यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्ववर चरणी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

▪️विश्वासार्ह, आश्वासक चेहरा हरपला; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रतन टाटा यांना श्रद्धांजली
मुंबई, : “उद्योगपती रतन टाटा हे भारतीय उद्योगक्षेत्राचा विश्वासार्ह, आश्वासक चेहरा होते. टाटा उद्योगसमुहाला आंतरराष्ट्रीय उंची, सन्मान, प्रतिष्ठा, विश्वासार्हता मिळवून देतांना देशाचा गौरव वाढवण्याचं काम त्यांनी केलं. सचोटी, प्रामाणिकपणाने उद्योग क्षेत्रात यश मिळवता येतं हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करुन दाखवलं. संकटकाळात देशवासियांच्या मदतीला धावून येणारा, सामाजिक बांधिलकी जपणारा उद्योगसमुह म्हणून टाटा उद्योगसमुहाला देशभक्तीचं प्रतिक बनवण्यात ते यशस्वी ठरले. सर्वसामान्य भारतीयांचं कारचं स्वप्न त्यांनी ‘नॅनो’ कारच्या माध्यमातून पूर्ण केलं. टाटा उद्योगसमुहाचे संस्थापक नुसेरवानजी, जमशेटजी टाटा यांचा उद्योग, व्यापार, सामाजिक कार्य, देशभक्तीचा वारसा त्यांनी यशस्वीपणे पुढे नेला. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रेम, आदर, आपुलकीचं स्थान निर्माण करणाऱ्या रतन टाटा साहेबांचं निधन ही भारतीय उद्योगजगताची मोठी हानी आहे. टाटा परिवार आणि रतन टाटा साहेबांच्या चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. रतन टाटा साहेबांना सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.