डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात अत्याधुनिक करिअर डेव्हलपमेंट, प्लेसमेंट विभागाचा प्रारंभ; डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
schedule11 Oct 25 person by visibility 221 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : डी. वाय. पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयात अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त करिअर डेव्हलपमेंट, प्लेसमेंट आणि आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे उद्घाटन डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी विश्वस्त ऋतुराज पाटील आणि विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय गेल्या ४१ वर्षापासून गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणासाठी कार्यरत आहे. महाविद्यालयात विद्यार्थी केंद्रबिंदू मानून अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्वोत्तम प्लेसमेंट रेकॉर्डसाठी ओळखल्या जाणाऱ्या या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या करिअरच्यादृष्टीने सर्व सोयीनी युक्त असा अत्याधुनिक करिअर डेव्हलपमेंट, प्लेसमेंट आणि आंतरराष्ट्रीय संबंध विभाग सुरु केला आहे.
नवीन उभारण्यात आलेल्या या विभागात १२४ विद्यार्थ्यांची क्षमता असलेली उच्च तंत्रज्ञानयुक्त कॉम्प्युटर लॅब, १२० आसनी वातानुकूलित सेमिनार हॉल, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित चार मुलाखत कक्ष अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी सक्षम बनविणे हे आमचे ध्येय आहे. या नव्या विभाग्तील आधुनिक सुविधा विद्यार्थ्यांच्या करिअर विकासासाठी भक्कम व्यासपीठ ठरतील. उद्योगजगताच्या बदलत्या गरजेनुसार विद्यार्थ्याना नवनवीन ज्ञान व प्रशिक्षण देऊन त्यांना परिपूर्ण बनविण्यासाठी आमची संस्था नेहमी एक पाऊल पुढे राहते.
ऋतुराज पाटील म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या कंपनीमध्ये उत्तम नोकरी मिळावी यासाठी आमची टीम नेहमीच प्रयत्नशील असते. आधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधानीयुक्त नव्या विभागाच्यावतीने विद्यार्थी नोकरीबरोबरच उद्योजकतेसाठीही तयार होतील. आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून त्यांना जागतिक पातळीवरही काम करण्याची संधी मिळेल.
कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, या अत्याधुनिक सुविधा विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी उपयुक्त ठरतील. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचे कौशल्य अधिक विकसित होईल. त्यांना अधिक चांगल्या करीअर संधी उपलब्ध होतील.
यावेळी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, डॉ. महादेव नरके, डॉ. अजित पाटील, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, अधिष्ठाता (करिअर डेव्हलपमेंट अँड कॉर्पोरेट रिलेशन्स) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मकरंद काईंगडे यांच्यासह विविध विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.