रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच : आमदार राजेश क्षीरसागर
schedule12 Oct 25 person by visibility 247 categoryसामाजिक

▪️फेरीवाल्यांना शिस्त पाळण्याच्या व अधिकाऱ्यांना अन्यायकारक कारवाई टाळण्याच्या सूचना
कोल्हापूर : गेल्या काही वर्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या निधीतून ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. याची भुरळही कोल्हापूर वासियांसह पर्यटकांना पडत असून, रंकाळा तलावास भेट देणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासह खवय्यांचीही गर्दी होत आहे. या परिसरातील फेरीवाले याच उदरनिर्वाहावर अवलंबून असून, अधिकाऱ्यांनी समन्वय साधून अन्यायकारक कारवाई टाळावी.
तसेच फेरीवाल्यांनीही सूट दिली म्हणून त्याचा गैरफायदा न घेता शिस्त पाळून अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचे मत आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
गेल्या दोन दिवसांपासून रंकाळा येथील संध्यामठ परिसरातील फेरीवाल्यांवर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईबाबत फेरीवाल्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे दाद मागितली. या पार्श्वभूमीवर आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज संध्यामठ परिसरात भेट देवून फेरीवाले आणि अधिकारी यांच्यात समन्वय घडवून आणला.
यावेळी सूचना देताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, गेल्या काही दिवसांपूर्वी रंकाळ्यात कचरा, नासाडी झालेले अन्न टाकण्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. ही गंभीर बाब असून, रंकाळा तलावाचे कोणीही नुकसान करत असेल तर त्याला पाठीशी घातले जाणार नाही. रंकाळा तलावाचे सौंदर्य पाहण्यासाठी आलेल्या नागारीकामुळेच फेरीवाल्यांचे व्यवसाय सुरळीत सुरु असतात. पुढच्या काळामध्ये म्युझिकल फौंऊटेन सारख्या प्रकल्पांमुळे पर्यटकांच्या संख्येत भर पडणार आहे. त्यामुळे तलावाचे कोणतेही नुकसान किंवा प्रदूषण फेरीवाल्यांच्या कृतीमुळे होणार नाही याची काळजी त्यांनी स्वत: घेतली पाहिजे. रंकाळा फिरण्यासाठी आलेल्यांना त्रास न होता, रहदारीला अडथळा न होता आपला व्यवसाय करावा. त्याकरिता फेरीवाल्यांनी स्वत: आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. अधिकाऱ्यांशी सौजन्याने समन्वय साधून त्यांनाही सहकार्य करावे. अधिकारी वर्गानेही स्थानिक युवकांना व्यवसायाच्या दृष्टीने सहकार्य करावे. अन्यायकारक कारवाई होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना केल्या.
यावेळी भागातील रहिवासी नागरिकांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासमोर पार्किंग, वाहतुकीच्या कोंडी, कचरा उठावाबाबत मत व्यक्त केले. यावर आमदार राजेश क्षीरसागर यांनी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्याशी संवाद साधून वाहतुकीची कोंडी होवू नये, अनधिकृत पार्किंग होवून नये यासाठी रंकाळा मेन रोड परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त नेमण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त रमाकांत अडसूळ यांच्याशी संपर्क साधून नव्याने होणाऱ्या शहर विकास आराखड्यात रंकाळा स्टँड ते फुलेवाडी आणि क्रशर चौक ते जावळाचा गणपती चौक असा जोड उड्डाणपूल प्रस्तावित करण्याच्या सूचना दिल्या. यासह मंजूर असलेल्या निधीतून रंकाळा परिसरात आवश्यक सर्व ठिकाणी ओला व सुका कचऱ्याचे गारबेज कलेक्टर तात्काळ बसविण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, महानगरपालिका इस्टेट अधिकारी विलास साळोखे, पंडित पोवार, बंटी साळोखे, संग्राम जरग, कपिल साठे अजित साळोखे, शिवराज पोवार, संजय निगवेकर, काकाजी मोहिते, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.