योजनांचा लाभ न देणाऱ्या हॉस्पिटलची तक्रार द्या, कारवाई करतो : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
schedule12 Oct 25 person by visibility 162 categoryराज्य

कोल्हापूर : महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून कोणते हॉस्पिटल जर लाभ देत नसेल तर त्यांची तक्रार द्या, त्या हॉस्पिटलवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज दिले.
कुंथूगिरी (ता. हातकणंगले) येथे डॉ. सुजित मिनचेकर फाउंडेशनच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रसंगी पत्रकारांशी ते बोलत होते.
हॉस्पिटलमध्ये सध्या भरमसाठ बिल आकारणी करत आहेत. त्याचबरोबर योजनांचा लाभ दिला जात नाही, अशा अनेक तक्रारी असल्याचे पत्रकारांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना सांगून आपण यावर काय कारवाई करणार असा प्रश्न विचारला.
यावर मंत्री आबिटकर म्हणाले, महात्मा फुले जन आरोग्य योजना नागरिकांना उपयुक्त असणारी योजना आहे. सर्वसामान्य गरजू रुग्णांना हॉस्पिटलने योजनेचा लाभ देणे बंधनकारक आहे. ज्या हॉस्पिटलमार्फत योजनेचा लाभ दिला जात नाही, त्यांची तक्रार द्या, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे ठोस आश्वासन आबिटकर यांनी दिले.
यावेळी खासदार धैर्यशील माने, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे, जिल्हाप्रमुख विनायक जरांडे, मनमोहन खोत आदी उपस्थित होते.