डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम; राज्यातील प्रत्येक शासकीय शाळेत पोहचणार जागतिक दर्जाचे शिक्षण
schedule12 Oct 25 person by visibility 140 categoryशैक्षणिक

मुंबई : गणित आणि विज्ञान विषयातील प्रत्येक विद्यार्थ्याचे पायाभूत ज्ञान दृढ करण्यावर शासनाने भर दिला आहे. या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनामार्फत ‘डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम’ राबविण्यासाठी खान अकॅडमीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन आणि कुतूहल यांचा वारसा विद्यार्थ्यांमध्ये रुजविणारे प्रख्यात वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर यांच्या सन्मानार्थ हा उपक्रम राबविला जात असून सुमारे 50 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल.
या कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये राज्यातील सुमारे 62 हजारांहून अधिक जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीसाठी खान अकॅडमीची जागतिक दर्जाची आणि महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रमाशी संलग्न असणारी गणित आणि विज्ञान विषयक शैक्षणिक सामग्री (डिजिटल कंटेंट) अध्यापन-अध्ययन प्रक्रियेत समाविष्ट केली जाईल. ही शैक्षणिक सामग्री मराठी व इंग्रजी भाषेत उपलब्ध असणार आहे. यातील व्हीडिओ वापरून शिक्षक वर्गामधील अध्यापन अधिक समृद्ध करू शकतील तसेच विद्यार्थ्यांना व्हिडिओ-आधारित धडे आणि सराव प्रश्नांच्या माध्यमातून शाळेत व घरच्या घरी संकल्पनात्मक आकलन दृढ करण्याची संधी मिळेल.
या भागीदारीचा भाग म्हणून, खान अकॅडमी इयत्ता सहावी ते दहावीसाठी असणारी विज्ञान विषयक शैक्षणिक सामग्री आता इंग्रजी आणि मराठी भाषेत तसेच महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय, राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षांसाठी मराठी व इंग्रजी भाषेत शिष्यवृत्ती तयारी अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आला आहे. डिजिटल संसाधने वापरून अध्यापन प्रभावी करता यावे आणि विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षणाचा अनुभव देता यावा या उद्देशाने राज्यातील सर्व शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अध्यापन सहायक ‘Khanmigo’ मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम राज्य शिक्षण विभाग (शालेय शिक्षण आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली) आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जाणार आहे. याचे सनियंत्रण जिल्हा शिक्षण अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) यांच्या देखरेखीखाली, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या साहाय्याने केले जाईल. यासाठी वास्तव-वेळेतील माहिती देणारा रियल टाइम प्रोग्राम डॅशबोर्ड वापरला जाईल. यामध्ये विद्यार्थ्यांचा वापर, अध्ययनात घालवलेला वेळ व अध्ययन निष्पत्ती यांची माहिती मिळेल. यामुळे विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रगतीचे पारदर्शक पद्धतीने निरीक्षण करता येईल.
‘डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान शिक्षण वृद्धी कार्यक्रम’ राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देत उच्च-गुणवत्तेची आणि जागतिक दर्जाची शैक्षणिक सामग्री उपलब्ध करून देईल. प्रत्येक विद्यार्थी, त्याच्या भौगोलिक स्थान व पार्श्वभूमीची पर्वा न करता, गणित आणि विज्ञान या भविष्योन्मुख विषयांमध्ये मजबूत पाया तयार करू शकेल. या उपक्रमाद्वारे भौगोलिक व साधनसंपत्तीच्या अडचणी दूर करून, लाखो विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, कुतूहल आणि महत्वाकांक्षा यांसह शिकण्याची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.