कोल्हापूरात २८ ऑक्टोबरला जिल्हास्तर युवा महोत्सव; युवक-युवतींना सहभागाचे आवाहन
schedule12 Oct 25 person by visibility 163 categoryराज्य

कोल्हापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे दरवर्षी आयोजित होणाऱ्या जिल्हास्तर, विभागस्तर आणि राज्यस्तर युवा महोत्सवाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन २८ ऑक्टोबर २०२५ रोजी पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे होणार आहे. या महोत्सवातून निवड झालेला ३० युवक-युवतींचा चमू केंद्रीय युवा व खेल मंत्रालयातर्फे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या आयोजनासंदर्भात १० ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नियोजनाचा आढावा घेण्यात आला. बैठकीस क्रीडा विभागाचे उपसंचालक सुहास पाटील, शाहीरविशारद डॉ. आझाद नायकवडी, भाग्यश्री कालेकर, प्रा. डॉ. संदीप देसाई, प्रा. डॉ. उदय भापकर, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, तालुका क्रीडा अधिकारी मनिषा पाटील आणि नेहरू युवा केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यंदा केंद्र सरकारने राष्ट्रीय युवा महोत्सवाला ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ (VBYLD) स्वरूप दिले असून, हा उपक्रम ‘विकसित भारत @ २०४७’ या दृष्टिकोनाशी जोडण्यात आला आहे. याअनुषंगाने सांस्कृतिक आणि नवोपक्रम ट्रॅक अंतर्गत समूह लोकगीत, समूह लोकनृत्य, कथालेखन, कवितालेखन, वक्तृत्व, चित्रकला आणि विज्ञान-तंत्रज्ञान प्रदर्शन असे उपक्रम आयोजित होणार आहेत. विज्ञान-तंत्रज्ञान प्रदर्शनात जैवतंत्रज्ञान, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, अक्षय ऊर्जा, पर्यावरण संवर्धन, आरोग्य तंत्रज्ञान आणि डिजिटल उपाययोजना यासारख्या विषयांवरील नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे प्रदर्शन होईल. तसेच प्लॅस्टिकमुक्ती आणि डिजिटल प्रशासन या विषयांवर हॅकॅथॉनचे आयोजन होणार आहे.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूरातील महाविद्यालये, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी संस्थांमधील विद्यार्थ्यांना विज्ञान-तंत्रज्ञान प्रदर्शनात आणि नवोपक्रम स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. कोल्हापूर हे कलानगरी म्हणून प्रसिद्ध आहे, त्यामुळे चित्रकला, लोकगीत, लोकनृत्य, वक्तृत्व, कवितालेखन आणि कथालेखन या वैयक्तिक व सांघिक स्पर्धांमध्येही युवक-युवतींनी आणि महाविद्यालयांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.
या महोत्सवात १५ ते २९ वयोगटातील युवक-युवती सहभागी होऊ शकतात. सहभागासाठी https://forms.gle/GC8RzS5X7Zaia2H67 या लिंकद्वारे २३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.