जिल्हा आरोग्य संपन्न करणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
schedule12 Oct 25 person by visibility 140 categoryआरोग्य

कोल्हापूर : सन 2030 पर्यंत संपूर्ण भारत टी.बी मुक्त करण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे या अंतर्गतच , 'माझं कोल्हापूर क्षय मुक्त कोल्हापूर ' ही संकल्पना घेऊन संपूर्ण जिल्हा टी.बी मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला असून सध्या त्याचे दृश्य परिणाम दिसून येत आहेत . जिल्ह्यातील आजरा ,भुदरगड आणि राधानगरी तालुक्यातील 94 ग्रामपंचायती या पूर्णता क्षयमुक्त झाल्या आहेत.या ग्रामपंचायती बरोबरच संपूर्ण कोल्हापूर जिल्हा लवकरच क्षयमुक्त करण्यात येईल असा विश्वास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला .
गारगोटी येथील इंदुबाई संस्कृती हॉल येथे टी . बी . मुक्त ग्रामपंचायत - 2024 पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते .
यावेळी व्यासपीठावर आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉ.दिलीप माने , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंगळे , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रशांत वाडीकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक,आजरा राधानगरी व भुदरगडचे गटविकास अधिकारी अनुक्रमे सुभाष सावंत, डॉ.संदीप भंडारे, डॉ.शेखर जाधव आदी उपस्थित होते .
ते पुढे म्हणाले नागरिकांनी टी .बी .ची अनावश्यक भीती बाळगू नये .आज 94 गावातील सरपंचांचा सत्कार झाला आहे ही बाब अत्यंत कौतुक व अभिमानास्पद आहे. जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी ग्रामविकासासाठी मतभेद विसरून एकत्रित येवून काम करावे. ग्रामविकास कार्याला आपण सर्वतोपरी सहाय्य करू अशी ग्वाही देत राज्यात , जिल्ह्यात योग संस्कृती वाढावी अशी अपेक्षा व्यक्त केली .यावेळी आबिटकर यांच्या हस्ते निक्षय पोषण आहार किटचे वाटप तसेच आजरा , राधानगरी व भुदरगड तालुक्यातील सुमारे 94 ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा महात्मा गांधीं यांचा पुतळा,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले .
तत्पूर्वी सर्वसामान्य लोकांमध्ये टी.बी या रोगाबद्दल व्यापक जन जागृती व्हावा या उद्देशाने हे टी.बी मुक्त ग्रामपंचायत अभियान राबविण्यात येत असल्याचे भुदरगड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आनंद वर्धन यांनी प्रास्ताविकात सांगितले . याप्रसंगी कल्याण निकम,अमोल पाटील,शिवाजी चौगुले तसेच विविध ग्रामपंचायत सदस्य ,सरपंच व आरोग्य विभागाचे इतर अधिकारी - कर्मचारी त्याचबरोबर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .