+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात : समीर देशपांडे; करवीर नगर वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त
schedule15 Oct 24 person by visibility 289 categoryदेश
नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्रात एका टप्प्यात, झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयुक्तांच्या घोषणेनुसार, महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबरला एकत्र जाहीर होणार आहेत.

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला राजीव कुमार यांनी सर्वप्रथम हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील जनतेचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, दोन्ही राज्यातील जनतेने उत्साहाने मतदान केले.

 यावेळी महाराष्ट्रात 1 लाख 186 मतदान केंद्रे असतील. एकूण मतदार 9 कोटी 63 लाख आहेत. झारखंडमध्ये एकूण 2 कोटी 60 लाख मतदार असून त्यापैकी 1 कोटी 29 लाख महिला मतदार आहेत. झारखंडमध्ये पुरुष मतदारांची संख्या १ कोटी ३१ लाख आहे. ८५ वर्षांवरील मतदारांना घरबसल्या मतदान करता येणार आहे. 

 

▪️असा आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम
 महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. 22 ऑक्टोंबर निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोंबर असून, 30 ऑक्टोबरला अर्जांची छानणी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर पर्यंत असेल. 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 25 नोव्हेंबर रोजी राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.

▪️महाराष्ट्रातील मतदार आणि मतदान केंद्रांची माहिती
महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे असून 288 जागांवर मतदान होणार आहे. यातील 234 जागा या सर्वसाधारण उमेदवारांसाठी असून, अनुसूचित जमात प्रवर्गासाठी 25 तर 29 जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. राज्यात एकूण 9.63 कोटी मतदार असून, यामध्ये 4.97 कोटी पुरुष आणि 4.66 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. राज्यभरात एकूण 1 लाख 186 मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यापैकी 42 हजार 604 मतदान केंद्रे शहरी भागात तर 57 हजार 582 मतदान केंद्रे ग्रामीण भागात आहेत.

▪️यावेळी निवडणूक आयोगाने 530 मॉडेल मतदान केंद्र उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी दिली. या निवडणुकीत 18.67 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. तसेच 6 लाख 2 हजार दिव्यांग मतदार व 12 लाख 5 हजार ज्येष्ठ नागरिक मतदार यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावतील. राज्यातील निवडणुकीसाठी सखोल तयारी सुरू असून नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

▪️नांदेड, केरळ आणि उत्तराखंड यासाठी पोटनिवडणुकीची तारीख निश्चित
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नांदेडमध्ये होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होईल. नांदेड लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली. यासोबतच, केरळमधील एका विधानसभेच्या मतदारसंघात आणि वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तसेच, उत्तराखंडमधील एका विधानसभेच्या मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात येईल.

▪️भारत निवडणूक आयोगाकडून जिल्हा निवडणूक अधिकारी (DEOs) आणि पोलीस अधीक्षक (SPs) यांना विशिष्ट निर्देश दिले आहेत, ज्यायोगे निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्व पक्षांसाठी समान पातळी निर्माण केली जावी. यात पूर्ण निष्पक्षता राखून कार्य करण्याबाबत आणि सर्वांसाठी समान पातळी सुनिश्चित करणे, मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांच्या डेस्कच्या उभारणीसाठी क्षेत्राचे स्पष्ट चिन्हांकन करणे, सर्व मतदान केंद्रांमध्ये 100% वेबकास्टिंग सुनिश्चित करणे, सर्व मतदान केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा सुनिश्चित करणे - विशेषतः शहरी भागात लांब रांगा असतील तिथे वयस्करांसाठी बसण्याची सोय, मतदारांची सोय पाहता मतदान केंद्रे निवासस्थानापासून 2 किलोमीटरच्या आत असल्याची खातरजमा, 'पब्लिक डिफेसमेंट अॅक्ट' अंतर्गत लोकांचा अनावश्यक छळ टाळणे, केंद्रीय निरीक्षकांची माहिती सार्वजनिक करणे व सोशल मीडियावर लक्ष ठेवून, खोट्या बातम्यांवर त्वरीत प्रतिसाद देण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.

यावेळची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक खूपच रंजक असणार आहे. वास्तविक, दोन पक्ष फूट पडल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत आमनेसामने येणार आहेत. उद्धव गटाची शिवसेना आणि शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या अंतर्गत निवडणूक लढवणार आहे, तर शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुती आघाडीत निवडणूक लढवणार आहेत.

 चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी करत 48 पैकी 30 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीला केवळ 17 जागा मिळाल्या होत्या. मात्र, हरियाणात निवडणूक जिंकल्यानंतर भाजपचा उत्साह पुन्हा उफाळून येणार आहे.