शेतकऱ्यांचे विठ्ठलाला साकडे : शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे!
schedule04 Jul 25 person by visibility 113 categoryराज्य

कोल्हापूर : शेतकऱ्यांवर लादण्यात आलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची व राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दे असे साकडे शक्तीपीठ महामार्गबाधित राज्यातील १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी विठ्ठलाला घातले. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी व खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे साकडे घालण्यात आले. पंढरपुरातील छत्रपती शिवाजी चौकातून पायी दिंडीद्वारे शेतकऱ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात नामदेव पायरीपर्यंत जात विठूरायाच्या चरणी साकडे घातले.
आमदार सतेज पाटील म्हणाले, लोकप्रतिनिधींचे, जनतेचे सरकार ऐकत नाही. त्यामुळे शेवटी विठ्ठलाचे तर सरकार ऐकेल म्हणून आम्ही विठ्ठलाला साकडे घातले आहे. महायुतीचे नेते विठ्ठलाच्या दर्शनाला येतील तेव्हा त्यांना शक्तीपीठ रद्द करण्याची बुद्धी विठ्ठल देवो.
राजू शेट्टी म्हणाले, विधानसभा निवडणुकीत दिलेला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमुक्तीच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी. महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलने झाली आहेत. शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी मुख्यमंत्रीदेखील येणार आहेत, पण त्यांच्या आधी आम्ही पांडुरंगाला साकडे घातले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शासनाने निवडणूक काळात दिलेला शब्द पाळावा अशीही मागणी शेट्टी यांनी केली.
शक्तिपीठ महामार्ग झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. शक्तिपीठ महामार्गाची गरज नसताना हा महामार्ग लोकांच्या माथी मारला जात आहे. सरकारने या महामार्गाच्या भूसंपादनाला नव्याने मान्यता दिली असली तरी आमचा या विरोधातील लढा चालूच राहील. हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
यावेळी उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, सम्राट मोरे, सागर कोंडेकर, युवराज गवळी, भरत रसाळे, अजित पवार, सम्राट मोरे, किशोर ढगे, महेश खराडे, विठ्ठल मोरे, तानाजी बागल, मच्छिंद्र मुगडे शिवाजी पाटील, विजय रणदिवे उपस्थित होते.