उद्योग जगताच्या सबलीकरणासाठी ‘केआयटी’ची स्थापना : सचिन मेनन; केआयटीच्या ४३ व्या स्थापना दिवस नवीन संकल्पांनी उत्साहात
schedule04 Jul 25 person by visibility 285 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : कोल्हापूर येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाचा ४३ वा स्थापना दिवस आज संपन्न झाला. पश्चिम महाराष्ट्रातील अभियांत्रिकी शिक्षणातील दीपस्तंभ असणारी संस्था म्हणून केआयटी कडे आज पाहिले जाते.अभियांत्रिकी बरोबरच व्यावसायिक अभ्यासक्रमातील पदव्युत्तर शिक्षणातही केआयटीने स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेला आहे.हजारो क्षमतावान अभियंते, शेकडो उद्योजक, शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी, सैन्य अधिकारी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी संस्था म्हणून केआयटी कडे पाहिले जाते. समाजाचा ‘विश्वास’ देखील या संस्थेने आपल्या सतत राखलेल्या शैक्षणिक गुणवत्तेने संपादित केलेला आहे.
संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी म्हणाले, “ सध्याच्या औद्योगिक क्षेत्रातील स्पर्धात्मक युगामध्ये केआयटी दर्जात्मक शिक्षणाचा आग्रह ठेवून आधुनिकतेची कास धरत वाटचाल करीत आहे. सर्वप्रकारची मानांकने मिळवणाऱ्या या संस्थेला प्रदत्त स्वायत्ततेचा दर्जा ही प्राप्त झालेला आहे.आज केआयटी मध्ये दर्जेदार लॅब विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केल्या जात असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थां अनुभव संपन्न प्राध्यापक वर्ग या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठांशी करार करून येथील विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठांमध्ये काम करण्याची थेट संधी केआयटी उपलब्ध करून देत आहे ”.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे उपाध्यक्ष श्री सचिन मेनन आपल्या मनोगतामध्ये म्हाणाले, “ ज्या काळामध्ये संस्थापक संचालकांनी एक मोठा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत या कॉलेजची स्थापना केली आहे तो त्यांचा हेतू सफल होत असल्याबद्दल समाधान वाटत आहे. राष्ट्रीय व सामाजिक हित बाळगून अभियंत्यांना घडवणाऱ्या अशा आपल्या संस्थेसाठी आपण सर्व सक्रीय व कार्यतत्पर राहू ”. भारतातील स्थानिक उद्योग जगतासाठी केआयटी च्या अभियंत्याने योगदान दिले पाहिजे असा आग्रही मुद्दा त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत सजग केले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे सचिव दीपक चौगुले, विश्वस्त सुनील कुलकर्णी, दिलीप जोशी यांनी ही या स्थापना दिनाच्या निमित्ताने स्वत:चे मनोगत उपस्थितांसमोर व्यक्त केले. संस्थेतील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. सुजय खाडीलकर, डॉ.उमा गुरव, KIT IRF चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर अरळी, डॉ. मंदार सोनटक्के डॉ. वाय.एम.पाटील यांनी केआयटी बद्दल कृतज्ञता मनोगतातून व्यक्त केली.
सह-अधिष्ठाता,शिक्षण विभाग डॉ.दिपाली जाधव यांनी या स्थापना निमित्त आयोजित कार्यक्रमाचे स्वागत पर भाषण केले. अधिष्ठाता,शिक्षण विभाग डॉ. अक्षय थोरवत यांनी या कार्यक्रमाचा हेतू आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. ऋतूपर्ण करकरे यांनी केले.