शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सवानिमित्त के.एम.टी. उपक्रमामार्फत "ऐतिहासिक वास्तू दर्शन" सहलीसाठी विशेष बससेवा
schedule21 Jun 24 person by visibility 402 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 26 जून हा "शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती दिवस" म्हणून साजरा करणेत येणार आहे. या महोत्सवांतर्गत कोल्हापूर जिल्हयामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेत येत आहे. याचाच एक भाग म्हणून राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी उभारलेल्या विविध वास्तू, संस्था, ऐतिहासिक ठिकाणे यांचे दर्शनासाठी परिवहन उपक्रमामार्फत दि.30/06/2024 रोजी सकाळी 7.30 वा. दसरा चौक येथून “ऐतिहासिक वास्तु दर्शन” बस सेवेचे नियोजन करणेत आले आहे. दि.24/06/2024 ते दि.29/06/2024 या कालावधीमध्ये सकाळी 10.00 ते सायं.6.00 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी चौक वाहतूक नियंत्रण केंद्र येथे या विशेष बस सेवेसाठी आगावू आरक्षण केले जाणार आहे.
या विशेष सहलीमध्ये कोल्हापूर शहरांतर्गत असलेली ऐतिहासिक वास्तुंची ठिकाणे निश्चीत केली असून, त्यामध्ये श्री शाहू जन्मस्थळ कसबा बावडा, न्यु पॅलेस रमण मळा, ॲग्रीकल्चर कॉलेज कलेक्टर ऑफीस, शिवाजी टेक्नीकल सायन्स कॉलेज, शाहू वैदीक स्कुल - बिंदू चौक, साठमारी, केशवराव भोसले नाटयगृह / छत्रपती शाहू खासबाग मैदान, भवानी मंडप, टाऊन हॉल गंगाराम कांबळे उपहारगृह स्मृतीस्तंभ, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय व कोर्ट इमारत, राजर्षि छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ / नर्सरी बाग / छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी सरकार मंदिर या वास्तू दाखविणेत येणार आहेत. ऐतिहासिक वास्तू दर्शन वेळेसह या प्रवासाचा एकूण कालावधी 4 तास 30 मि. राहणार असून, या विशेष सहलीसाठी प्रति प्रवासी रु.40/- इतका तिकीट आकार ठेवणेत आला आहे.
तरी, या "विशेष ऐतिहासिक वास्तू दर्शन" बससेवेचा लाभ कोल्हापूर शहर व परिसरातील नागरिकांनी आगावू आरक्षण करुन घ्यावा, असे आवाहन परिवहन उपक्रमामार्फत करणेत येत आहे.