विजयी मेळावा : राज ठाकरे - उद्धव ठाकरे अखेर एकत्र, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या बदलाचे संकेत
schedule05 Jul 25 person by visibility 153 categoryराजकीय

मुंबई : महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या फडणवीस सरकारच्या निर्णयाविरोधातील मराठी जनतेचा संताप दिसून आला . महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेने (ठाकरे) यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर राज्य सरकारने दोन्ही शासन निर्णय रद्द केले. त्यामुळे आज (५ जुलै) मुंबईतील वरळी येथे विजयी मेळावा पार पडला . या मेळाव्यात बोलताना शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर युतीचे संकेत दिले आहेत. राज ठाकरे - उद्धव ठाकरे अखेर एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या बदलाचे संकेत आहेत.
यावेळी राज ठाकरे म्हणाले, आज जवळपास २० वर्षांनंतर मी आणि उद्धव एका व्यासपीठावर आलो. कोणत्याही वादापेक्षा आणि कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे.आज माझ्या मराठीकडे आणि महाराष्ट्राकडे वेड्या वाकड्या नजरेने पाहायचे नाही. बाळासाहेब ठाकरेंनी मराठीच्या अभिमानाबद्दल तडजोड नाही केली. हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा पुढे करून यांनी फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वतंत्र करता येते का? त्यासाठी आगोदर भाषेला डिवचून पाहिले.
हिंदीभाषिक राज्ये आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. ज्या राज्यांना आर्थिक विकास करता आला नाही आणि आम्ही त्यांची हिंदी भाषा शिकायची का? हिंदी न बोलणारी राज्ये आहेत. ती आर्थिकदृष्ट्या प्रगत आहेत.
राज ठाकरे म्हणाले मराठी म्हणून तुम्हाला एकत्र येऊ देणार नाही. यांचं पुढचं राजकारण म्हणजे पुन्हा जातीत विभागायला सुरूवात करतील. पुन्हा जातीत तुम्हाला विभागतील. तसेच विनाकारण कुणाला मारायची गरज नाही. पण जास्त नाटकी केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. पण चूक त्यांची असली पाहिजे तसेच अशा घटनेचे व्हिडिओ करू नका असा सल्लाही त्यानी दिला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी माणसाने लढून मुंबई मिळवली आहे. भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही, असे फडणवीस म्हणाले. पण जर मराठीसाठी आंदोलन करत असेल आणि तुम्ही त्याला गुंड म्हणत असाल तर आम्ही आहोत गुंड. जर गुंडगिरी केल्याशिवाय न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करू. भाजप ही अफवाची फॅक्ट्री आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं अशी अफवा उठवली. पण आम्ही तुमच्यापेक्षा जास्त कडवट हिंदुत्व आहे. असेही उद्धव ठाकरे म्हणाले
आज अनेक बुवा, महाराज बिझी आहेत. कोण लिंबू कापतेय. कोण रेडे कापत असेल. त्या सर्वांना सांगतोय. त्या भोंदूपणाविरोधात आजोबांनी लढा दिला होता. आता आम्ही एकत्र उभे आहेत. आमच्या दोघातील अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला. एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी असे सांगत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या सोबत युतीचे संकेत दिले आहेत.
या मेळाव्यासाठी राज ठाकरे त्यांच्या पत्नी शर्मिला, मुलगा अमित ठाकरे आणि मुलगी उर्वशीसह पोहोचले. उद्धव ठाकरे देखील त्यांच्या कुटुंबासह पोहोचले, ज्यात त्यांची पत्नी रश्मी आणि मुले आदित्य आणि तेजस यांचा समावेश होता. या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात मराठा समाज उपस्थित होता.