जिल्ह्याच्या विकासासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून योजनांची अंमलबजावणी करा : धैर्यशील माने
schedule11 Oct 24 person by visibility 220 categoryराज्य
▪️'दिशा' समितीच्या सभेत विभाग प्रमुखांना सूचना
कोल्हापूर : केंद्र शासन पुरस्कृत विविध योजनांच्या उद्धिष्ठपूर्तीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक खासदार धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती महाराणी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी उपस्थित प्रशासनातील अधिकारी वर्गाला त्यांनी विविध योजनांच्या अनुषंगाने आढावा घेवून सूचना केल्या. ते म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून योजनांची अंमलबजावणी करावी. तसेच बैठकीत पदाधिकारी, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून त्याची तत्काळ पुर्तता करा. केंद्र शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजनांची अंमलबजावणी करताना त्यांची उद्दिष्ट्ये पुर्ण होत आहेत का याचीही खात्री करा.
यावेळी जिल्हाधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, समितीचे सदस्य प्राची कानेकर, सागर पाटील, विजय भोजे, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती सभेत केंद्र शासनाच्या योजनांचा विभाग निहाय आढावा घेण्यात आला. योजनांचा उद्देश पुर्ण होण्यासाठी योजनांची अंमलबजावणी गुणवत्तापुर्वक करण्याच्या सूचनाही धैर्यशील माने यांनी दिल्या.
त्याच बरोबर कोल्हापूर विमानतळ, रेल्वे वाहतूक व सोयी-सुविधा, दुर्गम भागातील दुरसंचार सेवा व इंटरनेट सेवा यासह विविध केंद्रस्तरीय योजनांचा आढावा घेण्यात आला. या सभेत केंद्र शासनाच्या योजनेतून जिल्ह्यातील पंचगंगा प्रदूषण निमुर्लनाबाबत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, घरकुल योजनेतून अनुदान, कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय सुविधा, जिल्ह्यातील रस्त्यांची कामे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची कामे याची माहिती घेतली. या बैठकीत प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सुषमा देसाई यांनी प्रास्ताविक केले व विविध विषयांची माहिती सभेला सादर केली.
मागील सभेचा कार्यवृत्तांत वाचून यावेळी कायम करण्यात आला. सादर करण्यात आलेले अनुपालन अहवालावरतींही सविस्तर चर्चा यावेळी झाली. यावेळी अध्यक्ष व सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयांवर तपशिल सादर केले. यामध्ये बँकांनी आपल्याकडील योजनांचा सविस्तर डेटा तयार करून पुढिल सभेला सादर करावा. डाक विभागाच्या विविध योजना ग्राम स्तरावर पोहचण्यासाठी जिल्हा परिषद आणि भारतीय डाक यांच्यात एक सामंजस्य करार करून यामधून ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी योजनांची प्रसिद्धी करतील का याबाबत नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध ठिकाणी रेल्वेच्या अंडर ब्रीजखाली येत असलेल्या पावसाच्या पाण्याच्या समस्या अध्यक्षांनी मांडल्या व याबाबत प्रस्ताव रेल्वे विभागाला पाठवावा असे ठरले. बीएसएनएल बाबतही कवरेज बाबत त्यांनी आढावा घेतला. ज्या भागात कोणतेही नेटवर्क येत नाही अशा ठिकाणी प्राधान्याने काम करावे अशा सूचना सदस्य सचिव यांनी दिल्या. कोल्हापूर विमानतळ येथून दिल्लीसाठी विमानसेवा सुरू होण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रक्रियेला गती द्या. सौर ऊर्जेची अंमलबजावणी शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी प्राधान्याने करावी असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आवाहन केले. यामुळे सौर ऊर्जेची प्रसिद्धी गतीने होईल असे ते यावेळी म्हणाले.
दिशा समितीच्या बैठकीत रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच प्रकल्प संचालक यांनी सभेपुर्वी सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे स्वागत केले.