कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 साठी दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. यावेळी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदार जनजागृतीचा कार्यक्रम सुरु असून या अंतर्गत विविध माध्यमांतून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. या अंतर्गत दि. 25 ऑक्टोबर 2024 रोजी पालकांनी मतदान करावे, यासाठी विद्यार्थ्यांसाठी पत्रलेखनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्ह्यातील सुमारे 3 हजार 85 प्राथमिक व सुमारे 2 लाख 51 हजार 278 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पालकांना मतदानाचे आवाहन करणारे पत्र लिहून घेवून ही पत्रे पोष्टाद्वारे पाठविण्यात आली आहेत.
त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कापड व्यापारी, स्वीट मार्टस्, गीफ्ट आर्टिकल सेंटर्स, मोबाईल शॉपी यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे दिपावली सणानिमित्त खरेदीसाठी येणा-या लोकांना स्टिकर्सद्वारे मतदानाचे आवाहन करण्यात आले आहे. स्टिकर्सवर मतदारांना त्यांच्या मतदार यादीतील नाव शोधणे सुलभ व्हावे यासाठी क्यू आर कोडद्वारे सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सुमारे 1 लाख स्टिकर्स वाटप करण्यात आले आहेत.
स्वीपच्या माध्यमातून दि. 5 नोव्हेंबर 2024 रोजी सायकल रॅली आयोजित करण्यात आली असून ही सायकल रॅली एकाच वेळी कोल्हापूर शहर, इचलकरंजी, कागल, गडहिंग्लज, पन्हाळा व गारगोटी या ठिकाणी होईल, असे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीसाठी सुमारे 250 सायकलपटूंचा सहभाग असणार आहे. याद्वारे जिल्ह्यातील मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यात येणार आहे.
स्वीपच्या माध्यमातून दि. 9 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये लोकशाही दौड आयोजित करण्यात आली आहे. कोल्हापूर शहर, इचलकरंजी, कागल, गडहिंग्लज, पन्हाळा व गारगोटी या ठिकाणी ही दौड होणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या लिंकद्वारे नोंदणी करुन जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.