कोल्हापूर : भारतीय वायू दलाच्या (इंडियन एअर फोर्स) जवानांना सेवेवर कार्यरत असतानाही आपले उच्च शिक्षण पूर्ण करण्याची संधी शिवाजी विद्यापीठासमवेत झालेल्या सामंजस्य कराराद्वारे प्राप्त होणार आहे, ही अतिशय मौलिक बाब असल्याचे मत भारतीय वायू सेनेचे एअर व्हाईस मार्शल राजीव शर्मा यांनी आज येथे व्यक्त केले.
भारतीय वायू सेना आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यामध्ये आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. तर, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह वायू सेनेच्या ग्रुप कॅप्टन रचना जोशी, विंग कमांडर विनायक गोडबोले, विंग कमांडर बी.एम. जोसेफ प्रमुख उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान योद्धे होते आणि त्यांचे नाव धारण करणाऱ्या विद्यापीठासमवेत सामंजस्य करार करीत असताना भारतीय वायू सेनेला अत्यंत आनंद होत असल्याची भावना सुरवातीलाच व्यक्त करून एअर व्हाईस मार्शल श्री. शर्मा म्हणाले, या सामंजस्य कराराकडे मी केवळ अधिकारी आणि जवान यांच्याच कल्याणासाठीचा म्हणून पाहात नसून वायू सेनेच्या समग्र परिवाराचे शैक्षणिक उत्थान साधणारा हा करार आहे. देशातील अवघी २१ विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांसमवेत वायू दलाने करार केले त्यात शिवाजी विद्यापीठासह तीन संस्थांचा समावेश आहे. दहावी, बारावीनंतर सैन्यदलात भरती होणारे जवान, अग्नीवीर यांना त्यांचे पदवीचे शिक्षण घेता येईल, अधिकाऱ्यांना त्यांचे उच्चशिक्षण घेता येईल किंवा आवश्यक कौशल्याचे ज्ञान संपादन करता येईल, तसेच त्यांच्या परिवारातील मुलांनाही शिक्षण घेता येईल. वायू दल आणि विद्यापीठ या उभय बाजूंमध्ये सुसंवाद प्रस्थापित होऊन त्याचा वायू दलाशी संबंधित घटकांना लाभ व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माझ्या ‘निळ्या युनिफॉर्ममधील सहकाऱ्यांना’ या कराराचा लाभ होणार असल्याचा आनंद मोठा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाचे डीआरडीओ, डीआरडीई, डीएई, बीआरएनएस, बीएआरसी, आयआयजी, इस्रो इत्यादी विविध संरक्षण संस्थांशी संशोधकीय बंध प्रस्थापित झाले असल्याची माहिती दिली. अवकाश विज्ञान, हवामान शास्त्र, जिओ-इन्फॉर्मेटिक्स इत्यादी क्षेत्रांत विद्यापीठ मोठ्या प्रमाणात संशोधन करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा भारतातील सैन्यदलासमवेत होणारा असा हा पहिलाच सामंजस्य करार असल्याने तो ऐतिहासिक महत्त्वाचा असल्याचे सांगितले. ते म्हणाले, भारतीय वायू दलातील अग्नीवीर, जवानांना उर्वरित शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यापीठ मदत करेलच. पण, त्यापुढे जाऊन वायू दलाने त्यांच्या शैक्षणिक गरजा कळविल्यास त्यास अनुसरून अभ्यासक्रमही निर्माण करता येतील. काही अभ्यासक्रम हे ऑनलाईन व ऑफलाईन अशा हायब्रीड स्वरुपात राबविण्यात येऊ शकतील. त्याखेरीज आवश्यकतेनुसार अल्प कालावधीच्या काही कार्यशाळाही आयोजित करता येतील. अशा प्रकारे सामंजस्य कराराच्या कक्षा वर्धित करता येऊ शकतील.
यावेळी सामंजस्य करारावर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी, तर भारतीय वायू दलाच्या वतीने एअर व्हाईस मार्शल श्री. शर्मा यांनी स्वाक्षरी केल्या. विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी स्वागत केले. इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. प्रभंजन माने यांनी प्रास्ताविक केले, तर कुलसचिव डॉ. शिंदे यांनी आभार मानले.
▪️माजी विद्यार्थ्याची भूमिका महत्त्वाची
विंग कमांडर विनायक गोडबोले हे विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागाचे २१ वर्षांपूर्वीचे माजी विद्यार्थी आहेत. भारतीय वायू दलासमवेत आजचा सामंजस्य करार होण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ उभय पक्षांमध्ये योग्य समन्वय राखून आजचा सामंजस्य करार त्यांनी घडवून आणला. मातृसंस्थेचे ऋण काहीअंशी फेडण्याचा आपला हा प्रयत्न असून हा क्षण आपल्यासाठी अत्यंत भावनिक स्वरुपाचा असल्याचे गोडबोले यांनी यावेळी सांगितले.
▪️सामंजस्य कराराविषयी थोडक्यात...
या सामंजस्य करारान्वये, भारतीय वायू दलातील पात्र जवानांना शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन व दूरस्थ शिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रमाणपत्र, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेता येईल. त्यांना दलाच्या शिफारशीनुसार काही सवलतीही प्रदान केल्या जातील. वायू दलाच्या अधिकाऱ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी काही जागा विद्यापीठात राखीव ठेवण्यात येतील. त्याचप्रमाणे इच्छुक अधिकाऱ्यांना यूजीसी निकष पूर्ततेच्या अधीन पीएच.डी.साठीही प्रवेश देण्यात येईल. याखेरीज, सैन्यदलात कार्यरत, निवृत्त अथवा शहीद जवान, अधिकारी यांच्या मुलांनाही शिक्षणासाठी काही सवलती देण्यात येतील.
या सामंजस्य करार प्रसंगी मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, इंग्रजी अधिविभागातील डॉ. अक्षय सरवदे, डॉ. चंद्रकांत लंगरे, डॉ. राजश्री बारवेकर, डॉ. एम.एस. वासवानी आदी उपस्थित होते.