आमदार शिवाजी पाटील हनी ट्रॅप प्रकरण : बहीण-भावाला अटक
schedule12 Oct 25 person by visibility 212 categoryगुन्हे

कोल्हापूर : चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यासाठी मोबाइलद्वारे अश्लील मेसेज आणि फोटो पाठवून पैशांची मागणी करणाऱ्या मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील मोहन जोतिबा पवार (वय २६), शामल जोतिबा पवार (वय २६) या बहीण भावाला चंदगड पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक करून शनिवारी त्यांना ठाण्यातील चितळसर पोलिसांच्या ताव्यात दिले.
मोहन व शामलने आमदार पाटील यांचा नंबर मिळवत वर्षभरापासून त्यांना अश्लील मेसेज व फोटो पाठवत होते. तसेच राजकीय प्रतिमा मलीन करतो, अशी धमकी देत दोन ते तीन वेळा एकूण दहा लाखांची मागणी केली, पैसे न दिल्यास तुमची पोलिसात तक्रार करणार, अशी धमकीही त्यांनी पाटील यांना दिली. त्रास वाढल्यानंतर मात्र त्यांनी त्यांना ब्लॉक करून टाकले. पण, त्यानंतरही त्यांनी हा प्रकार सुरूच ठेवला.
आमदार पाटील यांनी अज्ञाताविरोधात चितळसर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. याविषयीची वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित तरुण मोहन याने आमदार पाटील यांचे सावर्डे येथील कार्यालय गाठले. माझी चूक झाली, मला माफ करा, अशी चूक पुन्हा करणार नाही, अशी विनवणी केली. त्यानंतर काहींनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
शनिवारी अधिक चौकशी केल्यावर शामलचा सहभाग स्पष्ट झाला. दोघांनाही चितळसर पोलिसांच्या ताब्यात दिले.बहीण-भावाच्या कारनाम्यामुळे चंदगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.