कोल्हापुरात फुटपाथवरील अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई सुरु
schedule08 Dec 25 person by visibility 77 categoryमहानगरपालिका
🔸सीपीआर चौक ते खानविलकर पेट्रोल पंपापर्यंत 12 अनाधिकृत व्यावयायीक शेड, सात टप-यांवर कारवाई; प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांची कारवाईवेळी पाहणी
कोल्हापूर : शहरातील रस्ते दुरुस्तीविषयक प्रलंबित पी.आय.एल.च्या सुनावणीदरम्यान मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या सर्किट बेंच, कोल्हापूर यांनी दिलेल्या मौखिक निर्देशांनुसार कोल्हापूर महापालिकेने आज फुटपाथवरील अतिक्रमणाविरोधात आजपासून कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. या कारवाईत सी.पी.आर.चौक ते खानविलकर पेट्रोल पंपापर्यंतच्या रोडवरील सामासीक अंतरातील 12 व्यावसायीक शेडवर कारवाई करुन ते निष्कासीत करण्यात आले आहेत. त्याचबरोबर फुटपाथवरील अनाधिकृत 7 टप-यांसह दोन ढकलगाडया व छप-यांवरही कारवाई करण्यात आली आहे. सामासीक अंतरातील व्यावसायीक शेडधारकांना महापालिकेच्या नगररचना विभागाने यापुर्वी नोटीसा दिल होत्या. या कारवाई दरम्यान सकाळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी जैन बोर्डिंग परिसरात अतिक्रमणाच्या कारवाईची स्वत: पाहणी केली. सदरची कारवाई दोन जेसीबी, दोन डंपर, अतिक्रमणनच्या गाडीद्वारे करण्यात आली.
शहरातील मुख्य रस्त्यांवरील अनाधिकृत शेड, फुटपाथवर बांधकाम साहित्य, मातीचे ढिगारे ठेवणे तसेच बस स्टँड, धार्मिक स्थळे, शाळा, रुग्णालये, न्यायालये व सरकारी कार्यालये अशा अतिगर्दीच्या ठिकाणी चहा नाश्ता, फळभाजी किंवा कोणताही किरकोळ व्यवसाय करणे पूर्णपणे बंदीचे आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सर्व फेरीवाले, हातगाडी फळ विक्रेते, चहा नाश्ता हातगाडी चालक आणि इतर छोट्या विक्रेत्यांना फुटपाथवरील साहित्य तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले आहेत.
ही कारवाई महापालिकेच्यावतीने उद्याही सुरु राहणार असून अशा प्रतिबंधित ठिकाणी व्यवसाय करताना कोणी आढळल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करुन त्यांचे साहित्य जप्त करण्यात येणार आहे.
यावेळी अतिरिक्तय आयुक्त शिल्पा दरेकर, रविकांत आडसुळ, उपायुक्त परितोष कंकाळ, किरण धनवाडे, शहर अभियंता रमेश मस्कर, उप-शहर रचनाकार एन.एस.पाटील, उप-शहर अभियंता सुरेश पाटील, निवास पवार, महादेव फुलारी, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
▪️कोल्हापूर शहरातील 52 विनापरवाना व अनाधिकृत बोर्डवर कारवाई
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील तरतुदीनुसार व मालमत्तेच्या विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम 1995 नुसार शहरातील अनाधिकृत व बेकायदेशरी 7 विनापरवाना व अनाधिकृत बोर्डवर आज कारवाई करण्यात आली. विभागीय कार्यालय क्र.1 गांधी मैदान अंतर्गत आज कळंबा फिल्टर हाऊस ते आय.टी.आय व कळंबा जेल येथील 45 बोर्ड व विभागीय कार्यालय क्र.3 अंतर्गत दसरा चौक येथील 7 अनाधिकृत बोर्ड व एक शेडवर ही कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर व शहर अभियंता यांच्या नियंत्रणाखाली उप-शहर अभियंता महादेव फुलारी व अरुण गुर्जर, कनिष्ठ अभियंता अक्षय अटकर व कर्मचा-यांमार्फत करण्यात आली.