+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule21 Mar 24 person by visibility 577 categoryसंपादकीय
सध्या मुस्लिम धर्मीयांचा रमजान या पवित्र महिन्याची सुरुवात झाली असून रमजान चे उपवास, पाच वेळची नमाज पठन, कुराण पठन, गोरगरीबांना दानधर्म, जकात, इफ्तार , यांसारखे विधी व संस्कार सर्वत्र सुरू आहेत, कोल्हापूर ही राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या पुरोगामी विचारांची भूमी असून येथे सामाजिक सलोखा व एकोपा नेहमीच दिसून येतो, या पार्श्वभूमीवर हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी घालून दिलेल्या कृतीशील वैचारीक आदर्शाबद्दल...

  दीनदलितांच्या आणि गोरगरीबांच्या उद्धारासाठी आपली संपूर्ण हयात कामी लावणारा एकमेव राजा म्हणून राजर्षी शाहू छत्रपती महाराज तमाम महाराष्ट्रप्रेमी जनतेच्या हृदयात विराजमान झाले आहेत. त्यांनी सनातन्यांनी रूढी, परंपरा आणि धार्मिक अंधश्रद्धा यांचे जे स्तोम माजवून बहुजन समाजातील अज्ञानी जनतेला वेठीस धरले होते, त्यांच्या विरोधात आपला राज्यशकट हाकला. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखून त्यांनी बहूजन समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

 स्वार्थी व आपमतलबी वृत्तीने शिक्षण ही केवळ आपली मक्तेदारी बनवून एका विशिष्ट जातीच्या वर्गाने बहूजन समाजाला शेकडो वर्षे शिक्षणापासून कोसो मैल दूर ठेवले होते. ही गोष्ट सर्वप्रथम महात्मा जोतीराव फुले यांच्या लक्षात आली.राजर्षी शाहू महाराज यांच्या वर त्यांचे शिक्षक सर फ्रेजर आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांचा प्रभाव होता. महात्मा फुले यांनी आपल्या अखंडात म्हटले आहे की,....

"धर्म राज्य भेद मानवा नसावे|सत्याने वागावे | ईशासाठी ||
ख्रिस्त, महंमद, मांग, ब्राह्मणाशी |धरावे पोटाशी | बंधूपरी||
निर्मीकाचा धर्म सत्य आहे एक |भांडणे अनेक |कशासाठी?||"

  समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा हा राजर्षी शाहू महाराजांचा उद्देश होता. त्यासाठी त्यांनी सर्व जातीच्या व धर्माच्या लोकांनी शिक्षण घ्यावे म्हणून वसतीगृहांची निर्मिती केली.

 मुस्लिम समाज हा या देशातील भारतीय समाजाचा एक अविभाज्य घटक आहे आणि राष्ट्राची प्रगती व्हायची असेल तर मुस्लिम समाजातील मागासलेपण नष्ट झाले पाहिजे असे त्यांचें मत होते. मुस्लिम समाजातील अज्ञान नाहीसे होऊन त्याला गती मिळाली पाहिजे, आणि त्याकरिता हा समाज शिक्षणाभिमूख झाला पाहिजे; अज्ञानाच्या डबक्यात अडकलेला मुस्लिम समाज बाहेर पडावा व तो शिकावा, सवरावा यासाठी आवश्यक ती धोरणे डोळ्यासमोर ठेवून आपल्या राज्याचा कारभार करणारा हा पहिला राजा होय.

 रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या कोणत्याही ही राजाला, आपल्या राज्यातील सर्व धर्मांच्या व जातींच्या लोकांमध्ये सलोख्याचे व बंधुभावाचे संबंध असावेत, असे वाटत असते, अर्थात सर्व जातींधर्मांमध्ये सामाजिक सलोखा व बंधुभाव असेल तरच राज्याचा गाडा योग्य रीतीने हाकता येतो, हे तो जाणून असतो. राजर्षी शाहू महाराजांनी हे जाणले होते. त्यामुळेच कोल्हापूर संस्थानाचा कारभार आपल्या हाती घेतल्यानंतर दिनांक २ एप्रिल १८९४ रोजी त्यांनी हिंदू - मुस्लिम ऐक्याविषयीचे मुलभूत विचार मांडले असल्याचे दिसून येते.

राजर्षी शाहू महाराजांचा राज्यारोहन झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांचे सत्कार आयोजित करण्यात आले होते. पुणे येथील ' 'सार्वजनिक सभा ' या संस्थेच्या वतीने ही हिरा बागेत भव्य सत्कार सोहळा पार पडला होता.यावेळी शाहू महाराजांना मानपत्र देण्यात आले होते. यावेळी मानपत्राचे वाचन बॅरिस्टर गोपाळ कृष्ण गोखले यांनी केले होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना शाहू महाराजांनी नुकत्याच उद्भवलेल्या हिंदू - मुस्लिम दंगली संदर्भात म्हटले होते की, " या दोन समाजांत सलोखा आणि शांतता निर्माण केली जावी. हिंदू व मुस्लिम या दोन्ही समाजातील नेते त्या दृष्टीने प्रयत्न करत असतीलच. पण त्याचबरोबर सार्वजनिक सभेच्या नेते मंडळींनी हिंदू - मुस्लिम सलोखा व्हावा, म्हणून प्रयत्न करावेत."

 राजर्षी शाहू महाराजांनी हिंदू - मुस्लिम सलोखा संदर्भातील विचार सातत्याने अनेक वेळा व्यक्त केले आहेत, त्यांनी सामाजिक ऐक्य, धार्मिक सहिष्णुता व राष्ट्रीय एकात्मता ही तत्वे नजरेसमोर ठेवून आपल्या अनेक भाषणांतून हिंदू - मुस्लिम एकतेविषयीच नव्हे तर सर्व धर्मियांच्या एकतेचे विचार जाणीवपूर्वक व्यक्त केलेचे दिसून येते.

     दिनांक ३० मे १९२० रोजी नागपूर येथे 'अखिल भारतीय बहिष्कृत समाजा'च्या परिषदेत अध्यक्षपदावरून बोलताना राजर्षी शाहू महाराज म्हणतात, " आम्ही सर्व हिंदी आहोत. बंधू आहोत. हिंदी प्रजाजन कोणत्याही वर्गाचे असोत, कोणत्याही धर्मांचे असोत, ते सर्व हिंदी आहेत.व्यक्तीच्या दृष्टीने धर्माची बाब महत्त्वाची असेल, पण राष्ट्रीय बाबतीत ती केव्हाही आड येता कामा नये. यापुरती धर्म ही बाब फारच कमी महत्त्वाची आहे, असे मला वाटते. धर्म शब्दाची थोडक्यात व्याख्या देवाजवळ पोहोचण्याचा मार्ग अशी करता येईल. लंडन, मुंबई, कलकत्ता वगैरे मोठमोठ्या शहरात सर्व बाजूंनी रस्ते येऊन मिळतात. म्हणजे सर्व ठिकाणच्या लोकांचा उद्देश त्या त्या शहरी थोड्या वेळात व कमी श्रमाने पोहोचण्याचा असतो. त्याचप्रमाणे निरनिराळ्या देशात व परिस्थितीत उत्पन्न झालेल्या धर्माचा ही उद्देश तोच आहे. त्यामुळे जसे भिन्न भिन्न रस्त्यांनी मुख्य शहरास पोहोचणाऱ्या लोकांना एकमेकांचा द्वेष करण्याचे जसे कारण नाही - नसते तसेच निरनिराळे धर्म पाळून ईश्वराजवळ पोहोचणाऱ्या लोकांनी तरी परस्परांचा द्वेष का करावा?"

 "निरनिराळे धर्म स्थापन झाले त्या वेळेची स्थिती काय असेल ती असो, पण आजच्या स्थितीत तरी अमुक एका धर्माचे आचरण करून अमुक एक मनुष्य देवाजवळ पोहोचलेला आहे, असे प्रत्यक्ष दिसत नाही व तसा मार्गदर्शक आम्हास मिळत नाही तोपर्यंत माझा तेवढा धर्म चांगला व इतरांचा वाईट असा पोकळ अभिमान करण्याचा अधिकार कोणासही नाही."

  " राज्य संपादन करण्याच्या महत्त्वाकांक्षेने पूर्वी या देशात लढाया झाल्या. अकबर, शिवाजी महाराज वगैरे महात्म्यांचे काळी वर्णद्वेषाने किंवा जातीद्वेषाने कोणी लढाया करीत नसत. अकबर बादशहाच्या पदरी मराठे, रजपूत व इतर हिंदू सरदार व लढवय्ये लोक अनेक होते. विजयनगरच्या राजाचे पदरी किंवा श्री शिवाजी महाराज यांचे सैन्यात मुसलमानांची संख्या कमी नव्हती या सर्वांनी स्वधर्मियांबरोबर किंवा स्वजातीयांबरोबर लढण्याच्या प्रसंगी देखील आपले इमान कायम राखिले."

 सर्व धर्म तितकेच महत्त्वाचे व आदर्शवत आहेत, कोणी कोणाला धर्माच्या पातळीवर कमी समजू नये; एक संघ राष्ट्र उभारणीच्या कार्यात धर्म ही बाब आडवी येऊ नये, हीच महाराजांची आपल्या सर्व देशवासीयांना शिकवण होती.

  हुबळी येथे जुलै 1920 मध्ये भरलेल्या 'कर्नाटक ब्राम्हणेत्तर सामाजिक परिषदे'च्या अध्यक्षपदी राजर्षी शाहू महाराज होते, यावेळी बोलताना महाराज म्हणतात... "मुसलमान हे नेहमी मराठ्यांप्रमाणे क्षात्रकर्म करितात. त्यांच्या चालीरीती ही बहुतेक मराठ्यांप्रमाणे आहेत. मराठ्यांच्या फौजेत मोठ मोठे मुसलमान सरदार होते त्याचप्रमाणे मुसलमानांच्या फौजेत मराठी सरदार होते. हल्ली इंग्रज सरकारचे फौजेत मराठी व मुसलमान खांद्यास खांदा भिडवून लढले आहेत" अशाप्रकारे मुसलमान समाज हा या देशात कोणी परका नसून तो इथल्या बहुजन समाजाचाच एक भाग आहे, हे वास्तव समाजमनावर ठसविण्याचा प्रयत्न राजर्षी शाहू महाराजांनी जाणीवपूर्वक केलेला दिसून येतो.

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी राजर्षी शाहू महाराजांना अतिशय आदर आणि अभिमान होता.आपण शिवछत्रपतींचे वंशज आहोत याचा ते अभिमानाने उल्लेख करीत. युद्धाच्या धूमचक्रीत रणांगणावर पडलेल्या कुराणाची प्रत आदरपूर्वक हाती घेऊन मुस्लिम समाजातील योग्य व्यक्तीकडे ती सुपूर्द करणाऱ्या शिवछत्रपतींची कृती त्यांच्या धर्मनिरपेक्षतेची साक्ष देणारी होती. अशाच प्रकारे धर्मनिरपेक्षतेचे व उदारमताचे धोरण भारतात होऊन गेलेल्या अकबर बादशहाने ही स्वीकारले होते. आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर मोगल बादशहा अकबर यांचाही गौरव राजर्षी शाहू महाराज यांनी केल्याचा अनेक वेळा दिसून येतो.

 नाशिक येथे "उदाजी मराठा विद्यार्थी वसतिगृह "या संस्थेच्या इमारतीचा कोनशिला समारंभ राजर्षी शाहू महाराजांच्या हस्ते संपन्न झाला होता, त्या समारंभात केलेल्या भाषणात राजर्षी शाहू महाराज म्हणतात, "आमचे खरे महात्मा अकबर बादशहा हेच आहेत, ज्यांनी हिंदू मुसलमानांची एकी घडवून आणली व खुद्द स्वतः जोधाबाई नावाच्या रजपूत स्त्रीशी लग्न करून तिला हिंदूच राहू दिले, ही गोष्ट विसाव्या शतकात अशक्य झाली आहे ती सोळाव्या शतकात यवन बादशहाने सहज केली होती."

हिंदू - मुस्लिम ऐक्याचे विचार फक्त भाषणांतून मांडून ते स्वस्थ बसले नाहीत, तर त्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात हिंदू व मुसलमान या दोन्ही समाजांस समान न्यायाने वागविले, अनेक मुस्लिम समाजातील व्यक्ती त्यांच्या खाजगी बैठकीत आवर्जून उपस्थित असत. तर अनेक मुस्लिम समाजातील व्यक्तींना त्यानी महत्वाची पदे व वतने देऊन संस्थानात आपल्या पदरी ठेवले होते. मुस्लिम समाजातील अनेक दर्गे, मशिद व देवस्थानच्या निगराणीसाठी त्यांनी उदार अंतःकरणाने व सढळ हाताने मदत केल्याचे अनेक दाखले दिसून येतात. तसेच मुस्लिम समाजातील कवी, चित्रकार, गायक,पैलवान अशा गुणीजनांच्या गुणांचा गौरव करून त्यांना उदार राजाश्रय दिल्याचे दिसून येते. रमजानच्या महिन्यात सामुदायिक नमाजपठणसाठी जागा उपलब्ध करून देणे, पिण्याच्या पाण्याची सोय करून देणे, यांसारख्या संस्थानच्या वतीने सोयीसुविधा उपलब्ध करून देत, शिवाय मुस्लिम समाजातील कवी, चित्रकार, गायक,पैलवान व नेहमीच्या आपल्या खाजगी बैठकीतील मुस्लिम समाजातील व्यक्तींना खीर कुर्मा साठी लागणारी खजूर,खारीक, खोबरं, बदाम, पिस्ते यांसारख्या वस्तू व नवीन कपड्यांसाठी संस्थानमधून मदत देण्याचा आदेश देत असत.

 मुस्लिम समाजातील शिक्षणाविषयी असलेली अनास्था दूर व्हावी व शिक्षणाबद्दल जागृती निर्माण व्हावी यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरातील दसरा चौक येथील २५००० चौ.फूट जागा मुस्लिम समाजातील वसतिगृहासाठी व नमाजपठणसाठी बहाल केली. तसेच त्या जागेवर वसतिगृहाची इमारत बांधण्यासाठी ५५००/-रुपयाची मदत केली. याशिवाय वसतिगृहास रू.२५०/- इतके वार्षिक अनुदान ही मंजूर केले. इतकेच नव्हे तर संस्थेचा खर्च चालावा म्हणून रू.६७४५/- वार्षिक उत्पन्न असलेल्या हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील जमिनी संस्थेस दान दिल्या. इमारत बांधकामासाठी लागणारे सागवानी लाकूड आपल्या संस्थानातील जंगलातून विनामूल्य देण्याची तरतूद ही केली.

 मुस्लिम बोर्डिंगला राजर्षी शाहू महाराजांनी जी मदत केली ती मराठा समाजासाठी स्थापन केलेल्या व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगला दिलेल्या मदतीहून कितीतरी अधिक होती, हे लक्षात घेणे, महत्त्वाचे आहे.

  स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात ही देशात अनेक ठिकाणी हिंदू - मुस्लिम समाजात जातीय दंगली होत असताना कोल्हापूरात मात्र हिंदू - मुस्लिम हे दोन्ही समाज सलोख्याने व एकोप्याने रहात आले आहेत, हा इतिहास आहे; तमाम बहूजन समाज मोहरमचा सण साजरा करण्यात अग्रभागी असतो, करवीर नगरीची भूमी राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या पुरोगामी विचारांनी सुपीक केलीय, त्यामुळेच या भूमीत हिंदू मुस्लिम समाजातील सलोखा व ऐक्य आजही अबाधित आहे.

✍️ डॉ.सुनीलकुमार सरनाईक,
कोल्हापूर.
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत)

🟣 संदर्भ :
१)राजर्षी शाहू पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ, संपादक: डॉ.जयसिंगराव पवार, डॉ.मंजुश्री पवार.

२)श्री शाहू महाराजांच्या आठवणी,: भाई माधवराव बागल )