शिवाजी विद्यापीठाच्या १५४ विद्यार्थिनींची ‘इन्फोसिस’मध्ये निवड; केवळ विद्यार्थिनींसाठी विद्यापीठातील दुसरा सर्वात मोठा कॅम्पस ड्राईव्ह
schedule04 Nov 25 person by visibility 69 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक ख्यातीच्या इन्फोसिस कंपनीच्या वतीने शिवाजी विद्यापीठात केवळ विद्यार्थिनींसाठी या कॅलेंडर वर्षातील दुसरा सर्वाधिक मोठा कॅम्पस ड्राइव्ह आयोजित केला. याद्वारे विद्यापीठाच्या १५४ विद्यार्थिनींची कंपनीमध्ये अंतिम निवड करण्यात आली आहे.
इन्फोसिसतर्फे शिवाजी विद्यापीठात या कॅलेंडर वर्षात सलग दुसरा कॅम्पस ड्राईव्ह आयोजित करण्यात आला. फेब्रुवारीमध्ये झालेल्या पहिल्या ड्राइव्हला लाभलेला प्रतिसाद पाहून कंपनीने ऑक्टोबरच्या अंतिम आठवड्यातही केवळ विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थिनींसाठी कॅम्पस ड्राइव्ह घेतला. यामध्ये अभियांत्रिकी पदवीधरांसह गणित, संख्याशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकशास्त्र विषयांत एम.एस्सी. आणि एमसीए झालेल्या विद्यार्थिनींचा समावेश राहिला. या ड्राईव्हसाठी नोंदणी केलेल्या २१७२ विद्यार्थिनींपैकी १६३४ विद्यार्थिनी ऑनलाईन चाचणीसाठी पात्र ठरल्या. ऑनलाइन चाचणीसाठी १४३६ विद्यार्थिनी उपस्थित राहिल्या. त्यातील १७१ विद्यार्थिनींच्या मुलाखती घेऊन १५४ विद्यार्थिनींची अंतिम निवड करण्यात आली. फेब्रुवारीमध्ये नोंदणी केलेल्या २२०० विद्यार्थिनींपैकी १३०४ जणींची ऑनलाईन चाचणीसाठी निवड झाली होती. त्यातील ९४२ जणींनी चाचणी दिली. त्यामधून मुलाखतीसाठी १४५ जणींची निवड होऊन ७२ विद्यार्थिनींची अंतिम निवड करण्यात आली होती.
विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात आयोजित कॅम्पस ड्राईव्हचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. इन्फोसिसच्या सिनिअर असोसिएट लीड (टीम अॅक्विझिशन) मेधा बहुखंडी यांनी उपस्थित विद्यार्थिनींशी चाचणीपूर्व संवाद साधला आणि इन्फोसिस कंपनीविषयी माहिती दिली. याअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना इन्फोसिसच्या मैसूर येथील जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट प्रशिक्षण केंद्रामध्ये सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येईल आणि तेथील त्यांच्या एकूण कार्यप्रदर्शनानुसार योग्य ठिकाणी नियुक्ती देण्यात येईल. इन्फोसिस लिंगसमभावामध्ये विश्वास ठेवणारी कंपनी असून कंपनीमधील स्त्री-पुरूष गुणोत्तर हे ५०:५० करण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचेही त्यांनी अभिमानपूर्वक नमूद केले. विद्यार्थिनींच्या विविध शंकांचेही त्यांनी समाधान केले.
यावेळी डॉ. राजन पडवळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. शामल पवार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. अजित कोळेकर, डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. सोमनाथ पवार यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्रशिक्षण अधिकारी उपस्थित होते. कॅम्पस ड्राइव्ह यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यापीठाच्या संगणक केंद्राचे संचालक अभिजीत रेडेकर यांच्या नेतृत्वाखाली संगणक केंद्राची संपूर्ण टीम कार्यरत राहिली.