कोल्हापूर जिल्ह्यात तीन सोयाबीन खरेदी नोंदणी केंद्रे सुरु
schedule04 Nov 25 person by visibility 51 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्ह्यात हंगाम 2025-26 मधील सोयाबीन खरेदी करीता श्री अन्नपुर्णा सह. सोयाबीन खरेदी विक्री संस्था मर्या व्हनाळी (केंद्र-कागल), कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी उद्योग खरेदी विक्री संस्था मर्यादित कोल्हापूर (केंद्र- कोल्हापुर मार्केट यार्ड) व आजरा तालुका किसान सहकारी भात खरेदी विक्री संघ मर्यादित तालुका आजरा (केंद्र-आजरा) हि जिल्ह्यात तीन केंद्रे मंजुर करण्यात आली असून या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीनची नोंदणी करावी.
केंद्र शासनाने सोयाबीन- प्रति क्विंटल 5 हजार 328 रु. मुग -8 हजार 768 रु. व उडीद - 7 हजार 800 रुपये याप्रमाणे आधारभुत दर निश्चित केले आहेत. राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई व नाफेड कार्यालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने हंगाम 2025-26 मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेड व NCCF मार्फत मुग, उडीद व सोयाबीन खरेदी करीता शेतकरी नोंदणी 30 ऑक्टोबर पासुन प्रत्यक्षात खरेदी प्रक्रिया 15 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात येणार आहे.
शासनाने FAQ प्रतीच्या सोयाबीनसाठी 5 हजार 328 प्रति क्विंटल हा हमीभाव जाहीर केला आहे. नोंदणीकरिता शेतक-यांचा चालु (2025-26) हंगाम मधील आनलाईन सोयाबीन पिकपेऱ्याची नोंद असलेला 7/12 उतारा, आधार कार्डची झेराक्स, बँक पासबुक आवश्यक आहे. शेतक-यांनी संबंधित ठिकाणी जाऊन नोंदणी करुन घावी. नोंदणी करीता शेतक-यांनी प्रत्यक्ष उपस्थित रहाणे अनिवार्य आहे.
नोंदणीकृत शेतकऱ्यांची FAQ मालाची खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांनी खरेदी करीता SMS प्राप्त झाल्यानंतर शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेवुन जावा. जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष रोहित निकम, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे पाटील व संचालक मंडळाने केले आहे