+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule11 Nov 22 person by visibility 638 categoryसंपादकीय
 कोल्हापूर जिल्ह्याला विपुल निसर्गसंपदा लाभली असून जगभरातील पर्यटकांची पावले कोल्हापूरच्या दिशेने पडू लागली आहेत. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच महसूल विभागासह कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस विभाग व सर्व विभागांच्या समन्वयाने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबध्द प्रयत्न करण्यात येत आहेत. कोल्हापूरातील वेगवेगळ्या चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी.. इथली संस्कृती अनुभवण्यासाठी जिल्ह्यातील गड-किल्ले, निसर्ग सौंदर्य, जंगले, अभयारण्य यासह संपन्न पर्यटनस्थळे पाहण्यासाठी कोल्हापूरला आवर्जून यायला लागतंय..! अशी साद जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या 'दिलखुलास' कार्यक्रमात माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीव्दारे घातली आहे. या मुलाखतीचा सारांश..

कोल्हापूर जिल्हा हा नैसर्गिक दृष्ट्या वरदान मिळालेला जिल्हा आहे. येथे पावसाचे प्रमाण चांगले असून येथील मातीही अतिशय सुपीक आहे. नद्या, सिंचनाच्या व्यवस्था आणि शैक्षणिक, आर्थिक प्रगती या सर्वांमुळे इथल्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळते. नगदी पिकांचे प्रमाणसुद्धा खूप चांगले आहे. येथे ऊस हे महत्त्वाचे पीक असून भात, भुईमूग आणि सोयाबीन यासारखी पीकेही घेतली जातात. 

येथील साखर उद्योग मोठ्या प्रमाणात विकसित झाला असून जास्तीत जास्त एफआरपीची रक्कम देणारा तसेच सर्वात आधी शेतकऱ्यांना एफआरपी देणारा जिल्हा अशी कोल्हापूर जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे. मागील दोन वर्षांपासून जिल्ह्याला हेक्टरी 125 टन पर्यंत घेऊन जाण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. जिल्हा नियोजन समिती मधूनही त्याची तरतूद केली आहे. जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांनी प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम हाती घेतला आहे. प्रगतशील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे माहितीपट बनवणे, त्यांच्या शेतावर शेती शाळा आयोजित करणे, शेतकऱ्यांनी आपापल्या शेतामध्ये काय करावे, कोणते नवीन उपक्रम हाती घ्यावे यासह ऊसाचे उत्पादन वाढण्यासाठी या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे. साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शेतामध्ये सेंद्रिय पद्धतीचा वापर जास्तीत जास्त करणे, खतांचा वापर कमी किंवा नियंत्रित करणे आणि सोबतच पर्यावरणपूरक पद्धतीने ऊस उत्पादन घेऊन हेक्टरी 125 टन ऊसाचे उत्पन्न घेण्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न करण्यात येत आहेत.
दुग्ध उत्पादनात जिल्ह्याला आणखी पुढे नेण्यासाठी जिल्ह्यातील दूध उत्पादकांना अधिक पतपुरवठा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. दुग्ध उत्पादनाच्या विकासासाठी जिल्हा प्रशासन, सर्व लोकप्रतिनिधी आणि विविध संस्था -संघटनांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, आजरा, भुदरगड, चंदगड यांसारख्या डोंगराळ भागातील उत्पन्न वाढीच्या दृष्टीने दुग्ध उत्पादन, रेशीम उद्योग, मत्स्य व्यवसाय आणि बांबू लागवड यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा प्रशासन सरसावले आहे. राधानगरी, शाहूवाडी, चंदगडमधील काही भागांमध्ये मध उत्पादनाचे एक चांगले क्षेत्र आहे. या भागात अतिशय चांगल्या दर्जाची मध उत्पादने तयार होत आहेत. खादी आणि ग्रामविकास विभागामार्फत ‘मधाचे गाव’ आणि रेशीम उत्पादनासाठी ‘रेशमाचे गाव’ उपक्रमासाठी जिल्ह्यामध्ये प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकरी देखील या उद्योगांना चांगला प्रतिसाद देत असून गावागावांमध्ये याविषयीचे नियोजन सुरु झाले आहे.

पर्यटन वाढीसाठी पावले उचलण्यात आली आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्नशील आहे. साडेतीन शक्तीपीठ म्हणून ओळखलं जाणारं श्री अंबाबाईचं मंदिर, श्री क्षेत्र ज्योतिबा, नृसिंहवाडी येथील दत्तमंदिर, वास्तुशिल्पकलेचा अद्वितीय नमुना असणारं खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर अशी धार्मिक पर्यटन स्थळं कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. यासह अन्य धार्मिक, ऐतिहासिक, औद्योगिक, शैक्षणिक व अन्य विविध प्रकारची पर्यटन स्थळं या जिल्ह्यात आहेत. कागल औद्योगिक पंचतारांकित वसाहत, उद्यमनगर, शिरोली, गोकुळ शिरगाव, वस्त्रोद्योगासाठी प्रसिध्द असणारी इचलकरंजी, चांदीसाठी प्रसिध्द असणारी हुपरी अशी औद्योगिक स्थळे इथं आहेत. तर ऐतिहासिक पर्यटनस्थळे म्हणून ओळखले जाणारे पन्हाळगड, विशाळगड, पारगड, रांगणा, पावनगड, सामानगड, गगनगड असे अनेक गडकिल्ले इतिहासाच्या पाऊलखुणांची साक्ष देतात.

याशिवाय रंकाळा तलाव, नवीन राजवाडा, टाऊन हॉल म्युझियम, राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ आणि स्मृतीस्थळ, गव्यांसाठी प्रसिध्द असणारे राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य, कण्हेरी मठ, रामलिंग, राजर्षी शाहू महाराजांच्या कल्पनेतून साकार झालेलं स्वयंचलित दरवाजे असणारं राधानगरी धरण, काळम्मावाडी धरण, राऊतवाडी धबधबा, पन्हाळा तालुक्यातील जेऊर येथील व्हर्टिकल ॲडव्हेंचर पार्क हे साहसी पर्यटक केंद्र तसेच देवगिरी कृषी पर्यटन केंद्र पहायलाही पर्यटक येतात. खाद्य संस्कृतीसाठी कोल्हापूर सर्वपरिचित आहे. तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ, वडापाव यासह अनेक नानाविध चविष्ठ पदार्थांची चव कोल्हापुरात चाखायला मिळते. या ठिकाणचा गुळ, कोल्हापुरी साज, कोल्हापुरी चप्पल, बेडगी मिरचीला जगभरात मागणी आहे. या बाबींमुळे जगभरातील पर्यटक कोल्हापूर जिल्ह्याला भेट देतात..

कोल्हापूरची संपन्न संस्कृती, इथली माणुसकी, कोल्हापुरकरांचा मोकळेपणा व खरेपणा हे सर्व अनुभवण्यासाठी कोल्हापूरला नक्कीच आलं पाहिजे. कोल्हापूरची खाद्य संस्कृती, मसाले, कलाकुसर, हस्तकला, हुपरीतील चांदीचे दागिने आणि चांदी उद्योग तसेच इथली संपन्न शेती, अतिशय आधुनिक पद्धतीने करण्यात येणारे कृषी पूरक व्यवसाय, टेक्स्टाईल इंडस्ट्री, धातू उद्योग पाहण्यासाठी पर्यटकांनी इथे यायला हवे. खास करुन येथील संपन्न पर्यटनस्थळे, किल्ले, निसर्ग सौंदर्य, जंगले, अभयारण्य पाहण्यासाठी तर आवर्जून कोल्हापूरला यायलाच लागतंय...! (समाप्त)
 
    🟣 शब्दांकन : वृषाली पाटील, 
माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर