प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात भेट; जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी साधला संवाद
schedule22 May 25 person by visibility 262 categoryराज्य

कोल्हापूर : यशदा, पुणे येथील 2024 बॅचचे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी सध्या कोल्हापूर जिल्ह्याच्या अभ्यास दौऱ्यावर असून, आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, उपस्थित होते.
प्रशिक्षणार्थी आयएएस यांच्या महाराष्ट्र अभ्यास दौऱ्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाची माहिती घेणे, जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधणे आणि प्रशासकीय कामकाजाची प्रक्रिया समजून घेणे आदी कामांचा समावेश असतो. त्यांच्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजाचा अनुभव यावेळी मिळतो. जिल्हाधिकारी कार्यालय हे जिल्ह्याच्या प्रशासनाचे केंद्र आहे आणि ते विविध विभागांच्या कामकाजावर देखरेख ठेवते. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी या कार्यालयात येऊन विविध विभागांचे कामकाज कसे चालते, हे पाहतात. या भेटीचा मुख्य उद्देश जिल्हा प्रशासनाच्या कामाची माहिती घेणे आणि प्रशासकीय कौशल्याचा विकास करणे आहे.
या दौऱ्यात आकाश वर्मा, डोनुरु अनन्या रेड्डी, कौसल्या एम., कुश मोटवानी, नंदला साईकिरण, पी.के. सिध्दार्थ रामकुमार, शिवांश सिंघ, योगेश कुमार मीना हे प्रशिक्षणार्थी अधिकारी सहभागी आहेत. त्यांनी शहरातील विविध कार्यालयांसह मंदिर व प्रेक्षणीय स्थळांना तसेच गोकुळ डेअरीला भेट दिली. यावेळी त्यांनी डेअरीच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला व संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. प्रशिक्षणाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद, कोल्हापूर महानगरपालिका तसेच न्यू पॅलेस येथेही भेट दिली. कोल्हापूरच्या सांस्कृतिक, सामाजिक व शासकीय कार्यपद्धतीचा अभ्यास हा या दौऱ्याचा उद्देश आहे.