दुचाकी वाहनांची नोंदणी मालिका 17 डिसेंबरपासून
schedule10 Dec 25 person by visibility 65 categoryराज्य
कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दुचाकी नोंदणी मालिका MH09-HD दि. 17 डिसेंबर पासून सुरु करण्यात येत असून संबंधित वाहन चालकांच्या पसंती क्रमांकाचे अर्ज 17 व 18 डिसेंबर रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 3 या वेळेत खिडकी क्र. 9 येथे स्विकारण्यात येतील, अशी माहिती सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली.
पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत शासनाने विहित केलेल्या शुल्कानुसार त्या क्रमांकासाठी विहित असलेल्या मुळ रकमेचा Demand Draft (धनाकर्ष) जोडलेला असणे आवश्यक आहे.
धनादेश किंवा पे ऑर्डर अर्जासोबत देवू नये. Demand Draft (धनाकर्ष) काढताना SBI TRE. BRANCH KOLHAPUR GRAS या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्विकारला जाणार नाही. पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ रकमेचा एकच Demand Draft (धनाकर्ष) 17 व 18 डिसेंबर रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 3 या वेळेत कार्यालयात सादर करावा. 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यानंतर पसंतीच्या क्रमांकाच्या सिंगल डी.डी. व लिलावात गेलेल्या क्रमांकाच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील.
धनाकर्षाच्या मागे अर्जदाराने नाव, मोटार वाहनाचा प्रकार, मागणी केलेला नोंदणी क्रमांक व आधार लिंक मोबाईल क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्या क्रमांकाचा लिलाव करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने 19 डिसेंबर रोजी जादा रकमेचा एकच स्वतंत्र Demand Draft (धनाकर्ष) बंद लिफाफ्यात सकाळी 9.45 ते दुपारी 2.30 या कालावधीत जमा करणे बंधनकारक राहील. एकपेक्षा जास्त अर्ज असलेल्या नोंदणी क्रमांकाचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येईल. फक्त अर्जदार व प्राधिकृत प्रतिनिधी यांनाच लिलावास उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येईल व लिलावास येताना अर्जदाराने ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.
तसेच प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्यास त्यांच्याकडे प्राधिकारपत्रासह ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. आकर्षक क्रमांकाची मागणी करताना आधारला संलग्न असलेलाच मोबाईल नंबर व पत्ता अर्जावर लिहावा, अर्जावर मोबाईल नंबर नसल्यास कोणताही हक्क आकर्षक क्रमांकावर राहणार नाही. तसेच यादीमध्ये संबंधिताचे नाव आले तरी त्यांना आकर्षक क्रमांक मिळणार नाही.
सध्या सुरु असलेली दुचाकी वाहन मालिका HC मधील उर्वरित क्रमांक संपल्यानंतर नवीन मालिका HD फॅन्सी नंबर पोर्टलवर प्रदर्शित करण्यात येईल .