गोकुळच्या भविष्यातील योजनाचा दूध उत्पादक व ग्राहक दोघांचाही होणार दुहेरी फायदा : नविन मुश्रीफ
schedule09 Sep 25 person by visibility 262 categoryउद्योग

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) संघाच्या ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघाच्या भविष्यातील विविध योजनांची घोषणा करण्यात आली. दूध उत्पादक शेतकरी, ग्राहक आणि किफायतशीर दुग्ध व्यवसाय या तिन्ही आघाड्यांवर महत्त्वाचे ठरणारे निर्णय घेण्यात आल्याचे संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले. गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता उत्कृष्ट असल्यामुळे बाजारपेठेत त्यांना प्रचंड मागणी आहे. ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन आईस्क्रिम, चीज, तसेच सिताफळ–अंजीर–गुलकंद बासुंदी यांसारखी नवी उत्पादने बाजारात आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून गोकुळचे भविष्यातील निर्णय हे दूध उत्पादक, ग्राहक आणि दुग्ध व्यवसाय या सर्वांच्या हिताचा विचार करून घेतले आहेत. शेतकऱ्यांच्या जनावरांची गुणवत्ता वाढवणे, दुग्ध व्यवसाय फायदेशीर करणे आणि ग्राहकांना गोकुळचे नवनवीन व दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. गोकुळची ताकद म्हणजे शेतकरी आणि ग्राहकांचा विश्वास; हाच आमच्या यशाचा पाया असून या नव्या योजनांमुळे गोकुळ अधिक सक्षम होईल, असे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले.
शेतकरी व दुग्धव्यवसायाला चालना संघाकडून वासरू व रेडया संगोपन केंद्र सुरू करून ५०० हून अधिक जनावरे तयार करण्याचा मानस आहे. राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत आय.व्ही.एफ. व सेक्स सेल तंत्रज्ञानाद्वारे उच्च वंशावळीची जनावरे शेतकऱ्यांना माफक दरात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच म्हैस खरेदी अनुदान व वैरण विकास योजनेद्वारे म्हैस दूध उत्पादन वाढवण्याचा संघामार्फत प्रयत्न होणार आहे. प्राथमिक दूध संस्थेमधील जुनी दूध तपासणी मशिन्स (मिल्को टेस्टर) बायबॅक पद्धतीने बदलून नवीन दर्जेदार मशिन्स बसवली जाणार आहेत.
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पोषणयुक्त रेडी टू इट (टीएमआर पशुखाद्य) तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी नवीन २ एचपी चाफकटर कमी दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पर्यावरणपूरक उपक्रम भविष्यातील इंधनाची गरजा लक्षात घेऊन संघाकडून सीएनजी पंप व इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. यामुळे संघाचा वाहतूक खर्च कमी होऊन पर्यावरणपूरक ऊर्जा वापराला चालना मिळणार आहे.
विस्तार योजना नवी मुंबई (वाशी) व पुणे शाखेसाठी जागा खरेदी करून नवीन पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. तसेच वाशी शाखेत दही प्रकल्प सुरू करून ग्राहकांना उत्तम दर्जाची उत्पादने पुरवली जाणार आहेत.
वरील सर्व भविष्यकालीन योजना व उपक्रमामुळे दूध उत्पादकांचा दूध व्यवसाय किफायतशीर होण्यास मदत होणार आहे असे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले.