पोटनियम दुरुस्ती, महत्वपूर्ण विषयांना सभासदांची बहुमताने मंजुरी; ‘गोकुळ’ ची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण, खेळीमेळीत संपन्न
schedule09 Sep 25 person by visibility 481 categoryउद्योग

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,(गोकुळ) ची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक ०९/०९/२०२५ इ.रोजी महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना पंचतारांकित औद्योगिक वसाहत, कागल येथील कार्यालयाच्या आवारात गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेचे नोटीस वाचन व अहवालातील १ ते १० विषय वाचन कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले यांनी केले. तर सभेचे आभार संचालक शशिकांत पाटील–चुयेकर यांनी मानले.
यावेळी प्रास्ताविक करताना गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गेल्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात संघाने केलेली भरीव प्रगती, शेतकऱ्यांना दिलेले उच्चांकी दूध दर, स्वमालकीचे उभारलेले नवे प्रकल्प, उर्जा बचत, डिजिटल सेवा, सामाजिक बांधिलकी आणि भविष्यातील संकल्प, दिशा अशा अनेक महत्वाच्या बाबीतून गोकुळची वाटचाल सुरु आहे. तसेच गोकुळच्या भविष्यातील या योजनामुळे संस्थेच्या कामकाजाला नवी गती मिळणार असल्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अहवाल सादर करण्यात आला. संघामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाचा आढावा घेऊन दूध उत्पादक शेतकरी यांच्या हिताचे निर्णय घेण्यास आम्ही कटीबद्ध असल्याचे सांगितले.
▪️गोकुळची आर्थिक प्रगती : मार्च २०२५ अखेर उलाढाल : रु.३,९६६ कोटी. गतवर्षीच्या तुलनेत रु.२९६ कोटींची वाढ झाली. भाग भांडवल रु.७७.९८ कोटी झाले असून, यात रु.१.७४ कोटींची वाढ. राखीव व इतर निधी रु.५०२.२७ कोटी पर्यंत पोहोचला; यात रु.१०६.८२ कोटींची वाढ. मार्च २०२४ अखेर संघाच्या ठेवी : रु.२४८ कोटी मार्च २०२५ अखेर : रु.५१२ कोटी.
▪️अनुदान : अहवाल सालात प्रतिलिटर रु.०.४१ खर्च सेवा व अनुदानावर झाला. या हेतूसाठी एकूण रु.२३.७७ कोटी अनुदान दिले गेले.
▪️दूध संकलन :एकूण दूध संकलन : ५८.२० कोटी लिटर, म्हैस दूध : २७.०८ कोटी लिटर, गाय दूध : ३१.१२ कोटी लिटर, एक दिवसातील कमाल संकलन : १८.५९ लाख लिटर
▪️सरासरी गुणप्रत : म्हैस – फॅट ७.०%, SNF ९.४%, गाय – फॅट ४.०%, SNF ८.६%, दैनंदिन दूध संकलन गतवर्षीपेक्षा १.२० लाख लिटरने वाढले. दूध संकलनात एकूण ८.४२% वाढ नोंदली. वाहतूक खर्च प्रतिलिटर रु.०.८८ वरून रु.०.८३ इतका कमी झाला. कार्यक्षेत्राबाहेरील क्लस्टर BMC उभारणीमुळे संकलन वाढले. आगामी उद्दिष्ट : २० लाख लिटर टप्पा पार करून २५ लाख लिटर संकलन.
▪️दूध खरेदी दर : या आर्थिक वर्षात दर म्हैस दूध सरासरी रु.६०.४८, गाय दूध सरासरी रु.३६.८४ (दरफरकासह). आज गोकुळ राज्यातील सर्वाधिक दूध दर देत आहे. शासनाच्या दरा पेक्षा जादा दर गोकुळकडून दिला जातो. संघाकडे येणाऱ्या रु.१ पैकी ८१.३७ पैसे थेट उत्पादकांना परत जातात.
▪️दूध दर फरक : म्हैस दूध दर फरक : रु.२.४५ प्रति लिटर. गाय दूध दर फरक : रु.१.४५ प्रति लिटर.
▪️दूध दर फरक, डिबेंचर व्याज, दूध दर फरक व्याज व डिव्हीडंड अशा विविध माध्यमांतून रु.१३६ कोटींची रक्कम दिवाळीपूर्वी उत्पादक व संस्थांना दिली जाणार. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी उत्पादक व संस्थांना रु.२२.३७ कोटीने जादा रक्कम वितरित होणार.
▪️सरासरी गुणप्रत : म्हैस – फॅट ७.०%, SNF ९.४%, गाय – फॅट ४.०%, SNF ८.६%, दैनंदिन दूध संकलन गतवर्षीपेक्षा १.२० लाख लिटरने वाढले. दूध संकलनात एकूण ८.४२% वाढ नोंदली. वाहतूक खर्च प्रतिलिटर रु.०.८८ वरून रु.०.८३ इतका कमी झाला. कार्यक्षेत्राबाहेरील क्लस्टर BMC उभारणीमुळे संकलन वाढले. आगामी उद्दिष्ट : २० लाख लिटर टप्पा पार करून २५ लाख लिटर संकलन.
▪️संस्था कर्मचारी प्रोत्साहनात : दि. १/९/२०२५ पासून कर्मचारी प्रोत्साहनात रु.०.०५ ने वाढ, म्हणजे आता रु.०.७० प्रति लिटर. यानुसार एकूण रु.१.६० प्रति लिटर देण्यात येणार.
▪️इमारत बांधकाम अनुदान: संस्थांच्या दूध संकलन टप्प्यानुसार ८ ते १० हजार अनुदानात वाढ केली आहे. मुक्त गोठा अनुदान : सद्या अटी शिथील करून ४ जनावरांसाठी रु.१०,००० दिले जाणार.
यावेळी अहवालावरती संस्थानी पाठविलेल्या लेखी प्रश्नाचे उत्तरांचे वाचन कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले यांनी केले. आजपासून म्हैस वास दुधास प्रतिलिटर रु.१२ व गाय वास दुधास प्रतिलिटर रु.८ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्षेत्र आणि संस्थांची संख्या लक्षात घेता संचालक मंडळाची संख्या २१ वरून २५ करणे पोटनियम दुरुस्ती मंजुरीसाठीचा प्रस्ताव तसेच प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत बटर मेकिंग मशिन व पेढा प्रोजेक्टसाठी आरबीएल बँकेकडून घेतलेल्या कर्जास मंजुरी, दूध उत्पादकांना फर्टिमिन प्लस अनुदान/मोफत/सवलतीच्या दरात देण्यात आली आहे त्यास मंजुरी, मुंबई व पुणे येथील जागा खरेदीस सभादांनी बहुमतांनी मंजूरी दिली.
▪️गोकुळच्या भविष्यातील योजना -
१. आईस्क्रिम व चीज उत्पादन व विक्री सुरू करणे
२. नवी मुंबई (वाशी शाखा) आणि पुणे शाखेसाठी मदर डेअरीसाठी योग्य जागा खरेदी करणे
३. दही प्रोजेक्ट वाशी नवी मुंबई येथे राबविणे
४. वासरू संगोपन केंद्राद्वारे ५०० वासरे तयार करणे भविष्यातील योजना व सुधारणा
५. सी.एन.जी. पंप व इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणी – भविष्यातील वाहनांवरील खर्च कमी करणे व
▪️ पर्यावरणपूरक ऊर्जा वापर वाढविण्यासाठी.
६. जुनी दूध तपासणी मशिन बायबॅक योजना – संस्थांमध्ये जुनी मशिन घेऊन त्यांना बायबॅक पद्धतीने नवीन उन्नत दर्जाची मशिन पुरवणे.
७. सिताफळ, अंजीर व गुलकंद बासुंदी उत्पादन – ग्राहकांच्या आवडी लक्षात घेऊन बासुंदीच्या नवीन प्रकारांचे उत्पादन व विक्री.
८. ओला चारा व वाळलेला चारा मिश्रित ‘आयडीयल टी.एम.आर.’ उत्पादन – दूध उत्पादकांना उच्च दर्जाचे, पोषक व मिश्रित चारा पुरवणे.
९. लहान व अल्पभूधारक उत्पादकांसाठी कमी किंमतीचे नवीन २ एच.पी. न्यु मॉडेल चाफकटर तयार लवकरच उपलब्ध होणार.
१०. रेडया संगोपन, म्हैस खरेदी अनुदान व वैरण विकास : रेडया संगोपन केंद्र (Heifer Rearing Centre)
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत गोकुळमार्फत ५०० रेडयांचे संगोपन करणारे केंद्र लवकरच सुरू होणार. येथे रेडयांना आय.व्ही.एफ. व सेक्स सेल विर्यमात्रा वापरून गाभण केले जाईल.जिल्ह्यातील दूध उत्पादकांना उच्च वंशावळीची जनावरे माफक दरात उपलब्ध होणार.
तसेच या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी संघाच्या दूध उत्पादक यांना संघाच्या विविध योजनाची माहिती होण्यासाठी वैरण विकास विभाग, दूध संकलन विभाग, महिला नेतृत्व विकास, मिल्को टेस्टर विभाग, मार्केटिंग विभाग, पशुसंवर्धन विभाग, मिल्क कुलर विभाग, सेंद्रिय खते विभाग, इत्यादी विभागानचे स्टॅाल संघाच्या वतीने लावण्यात आले होते. त्याचे उद्घाटन मान. नामदार हसन मुश्रीफसो (वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य), आमदार सतेज पाटीलसो (मा.गृहराज्यमंत्री,महाराष्ट्र राज्य), माजी आमदार के.पी.पाटील,यांच्या हस्ते व संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे व सर्व संचालक यांच्या उपस्थित करण्यात आले.
यावेळी नामदार हसन मुश्रीफ (वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य), आमदार सतेज पाटील (मा.गृहराज्यमंत्री,महाराष्ट्र राज्य), माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार संजय घाटगे, संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, माजी आमदार राजेश पाटील, के.डी.डी.सी बँक संचालक ए.वाय.पाटील, अर्जुन आबिटकर, प्रताप उर्फ भैय्या माने व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, दूध संस्था प्रतिनिधी, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.