शिवाजी विद्यापीठ - बी.ओ.ए.टी. यांच्यात सामंजस्य कराराचे हस्तांतरण
schedule09 Sep 25 person by visibility 192 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त रोजगार संधी मिळवून देण्याच्या दृष्टीने बोर्ड ऑफ अप्रेंटिसशीप ट्रेनिंग (बीओएटी) सर्वतोपरी प्रयत्न आणि सहकार्य करेल, अशी ग्वाही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या बोर्ड ऑफ अप्रेंटिसशीप ट्रेनिंगचे पश्चिम विभागीय उपसंचालक डॉ. एन.एन. वडोदे यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठाने आपल्या सर्वच विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना विविध आवश्यक प्रशिक्षण व रोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या बोर्ड ऑफ अप्रेंटिसशीप ट्रेनिंगसोबत सामंजस्य करार केला आहे. या कराराचे हस्तांतरण आज विद्यापीठात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. वडोदे म्हणाले, देशात रोजगारवृद्धी होण्याच्या अनुषंगाने अंमलात आणण्यात येत असलेला ‘अप्रेंटिसशीप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम’ (एईडीपी) हा उपक्रम विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेमध्येच नोकरीची हमी मिळण्याच्या दृष्टीने लाभदायक ठरेल. त्यासाठी अभियांत्रिकीसह त्याखेरीजच्या विद्याशाखांतील विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण व रोजगार संधी उपक्रमात सामावून घेण्याचा बीओएटीचा मानस आहे. त्या दृष्टीने केंद्र सरकारने भरीव आर्थिक तरतूदही केलेली आहे. कोल्हापूरमधील व्यावसायिक, उद्योजकही विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशीप देण्याबाबत सकारात्मक आहेत. अनेक ठिकाणी विद्यार्थी काम करतही आहेत. अन्य विद्यार्थ्यांना अशी प्रशिक्षण संधी मिळावी, अशी अपेक्षा आहे. या अनुषंगाने बीओएटी प्रभावी मध्यस्थाची भूमिका बजावेल. बीओएटीसमवेत आजवर अनेक डिम्ड व स्वायत्त विद्यापीठांनी सामंजस्य करार केले आहेत. तथापि, शिवाजी विद्यापीठ हे अशा प्रकारचा सामंजस्य करार करणारे पहिले राज्य अकृषी विद्यापीठ आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठाने आजवर अनेक सामंजस्य करार केले आहेत. तथापि, केवळ अन् केवळ विद्यार्थ्यांवरच लक्ष्य केंद्रित असणारा हा एकमेव करार आहे, हे याचे वेगळेपण आहे. विद्यापीठासह परिक्षेत्रात बीओएटीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र व्यक्तीकडे जबाबदारी सोपविण्यात येईल. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. राजन पडवळ, डॉ. आलोक जत्राटकर उपस्थित होते.