मोडी लिपी अभ्यासक्रमाला २२ सप्टेंबरपर्यंत प्रवेश नोंदविण्याचे आवाहन
schedule09 Sep 25 person by visibility 220 categoryशैक्षणिक

कोल्हापूर: छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र इतिहास अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्यामार्फत दिनांक 22/09/2025 पर्यंत मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिन्याचा असून प्रवेशाकरिता शैक्षणिक पात्रता पदवी आहे.
शिवपूर्वकाळापासून ते स्वातंत्र्यकाळापर्यंत प्रशासनाची तसेच दैनंदिन कामकाजासाठी मराठी भाषेबरोबरच मोडी लिपी मुख्य लिपी असल्याने या काळाबाबतचा इतिहास अभ्यासण्यासाठी ही मोडी लिपी ज्ञात असल्याशिवाय संशोधन होऊच शकत नाही तसेच या काळातील कोणत्याही प्रशासकीय नोंदीकरीताही ही लिपी ज्ञात असणे अपरिहार्य आहे.
समकालीन सामाजिक शास्त्राच्या विद्यार्थ्यांपुढे नोकरीच्या संधींचा अभाव ही मोठी समस्या आहे. मात्र या विद्यार्थ्यांकडे एखादे कौशल्य असेल तर ते या समस्येवर सहजपणे मात करू शकतील. आज आपण सन १९६० पूर्वीच्या शेतीसंबंधीच्या नोंदी, जन्म-मृत्यू नोंदी, खरेदी पत्र तसेच या काळातील न्यायालयीन दावे यासंबंधीची सर्व कागदपत्रे ही मोडी लिपीतच उपलब्ध आहेत. मोडी लिपीचे ज्ञान असणारी व्यक्ती अशा कागदपत्राचे लिप्यांतर करून समाजात आपले योगदान देऊन आपल्या उपजीविकेचा प्रश्नही सोडू शकतो. याबरोबर मोडी लिपी ज्ञानाचा सर्वाधिक फायदा ही इतिहास व तत्सम सामाजिक शास्त्रामध्ये संशोधन करून इच्छिणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना होणार आहे. शिवपूर्व काळापासून इंग्रजी सत्तेच्या कालखंडातील महाराष्ट्र बृहत महाराष्ट्रबाबत कोणत्याही विषयावर संशोधन करायचे असेल तर मोडी लिपीचे ज्ञान असल्याशिवाय पर्याय नाही.
ही गरज लक्षात घेऊन सदरचा मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रम छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र इतिहास अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी, संशोधक विद्यार्थी, इतिहास अभ्यासक, इतिहास प्रेमी यांनी याचा लाभ घ्यावा, असे आव्हान केंद्राच्या समन्वयक डॉ. नीलांबरी जगताप यांनी केले आहे.
संपर्क : समन्वयक, छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, संपर्क क्रमांक ०२३१-२६०९४६७