विद्यार्थ्यांतून ‘विचारदूत’ घडविण्याचा शासनाचा संकल्प ‘हिंद-दी-चादर’ २४ व २५ जानेवारीला नांदेडला देशव्यापी कार्यक्रम
schedule18 Jan 26 person by visibility 55 categoryराज्य
कोल्हापूर : नांदेड येथे होणाऱ्या ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. १६ ते २३ जानेवारीदरम्यान जिल्हाभरातील शाळांमधून प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांना ‘विचारदूत’ म्हणून घडविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य देशव्यापी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत विद्यार्थी हातात फलक, घोषवाक्ये आणि जयघोष करत गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या बलिदानाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार आहेत.
इतिहास केवळ पुस्तकात न राहता कृतीतून समजावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवी मूल्यांसाठी दिलेले बलिदान नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, हा या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.
शहिदी समागमानिमित्त तालुका व जिल्हास्तरावर चित्रकला, निबंध, गायन आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यात येत असून, देशभक्ती, सहिष्णुता आणि मानवतेचे मूल्य रुजविले जात आहे.
या स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य सोहळ्यात करण्यात येणार आहे. ही विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’ असून, शासनाने शिक्षण क्षेत्राला दिलेले प्राधान्य यामधून स्पष्ट होत आहे.
राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग आणि सामाजिक संस्थांच्या सहभागातून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डिजिटल माध्यमांचाही प्रभावी वापर करण्यात येत असून, #hinddichadar350 या हॅशटॅगद्वारे नागरिकांना सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.
नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी होणाऱ्या या शहिदी समागम कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन एकता, सद्भावना आणि मानवतेचा संदेश समाजात रुजविणे हाच या आयोजनाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.