नवभारताचे उदात्त स्वप्न हा एन. डी. सरांचा ध्यास : कुलकर्णी
schedule17 Jan 26 person by visibility 39 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : प्रबोधन परंपरेतील कृतिशील विचारांचा नेता म्हणून एन. डी. सरांचे योगदान महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचे आहे. सामान्य माणसांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी चळवळी उभारल्या. निद्रिस्ताला जागे करणे हीच त्यांची प्रबोधनाची व्याख्या होती. सत्याचा आग्रह धरून त्यांनी हस्तक्षेपाचे राजकारण केले. त्यासाठी प्रबोधन विचारांची मूल्यव्यवस्था स्वीकारून ती रुजविण्यासाठी अथक प्रयत्न केले. नवभारताचे उदात्त स्वप्न हा त्यांचा ध्यास होता, असे प्रतिपादन प्रसाद कुलकर्णी यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील डॉ. एन. डी. पाटील लोकचळवळ अध्यासन आयोजित स्मृतिदिनानिमित्त ‘प्रा. एन. डी. पाटील: विचारविश्व आणि प्रबोधन’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे होते.
प्रसाद कुलकर्णी म्हणाले, सामाजिक बांधिलकी ही फक्त त्यांच्या बोलण्यात नव्हती. तिचा कृतिशील पाठपुरावा त्यांनी सातत्याने केला. रस्त्यावरची लढाई खेळणारे ते लढवय्या होते. तत्त्वनिष्ठ नैतिकता हा त्यांच्या जीवनाचा मूलाधार होता. गेल्या साठ वर्षांतील चळवळींचा इतिहास जर लिहायचा झाला, तर त्यात एन. डी. सरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
डॉ. शिंदे अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, तत्त्वांशी तडजोड न करता संवाद साधत समाजहिताची उभारणी करणे हा एन. डी. सरांचा सर्वात मोठा गुण होता. विधायक कामासाठी ते नेहमी पुढाकार घेत राहिले. महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीला त्यांच्या कार्याचे सदैव स्मरण राहील.
यावेळी एन. डी. पाटील यांच्या स्नुषा संगीता पाटील यांनी प्रा. एन. डी. पाटील यांच्या आठवणी सांगितल्या. मराठी विभागप्रमुख प्रा. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले.
यावेळी प्रा. नंदकुमार मोरे, डॉ. बळवंत मगदूम, डॉ. पी. टी. सावंत, डॉ. दीपक भादले, मतीन शेख, सोनाली जाधव, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.