कोल्हापुरात 'महा-पल्स एआय' प्रकल्पाचा शुभारंभ
schedule16 Nov 26 person by visibility 70 categoryराज्य
कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून 'महा-पल्स एआय' (MahaPulse AI) या अद्ययावत प्रकल्पाचा ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून शुभारंभ करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या प्रकल्पाची सुरुवात झाली.
उत्तर प्रदेशच्या 'HOPE' मॉडेलपासून प्रेरणा घेऊन, आयआयटी मंडी (IIT Mandi) चे सहकार्य आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून हे अधिक प्रगत मॉडेल तयार करण्यात आले आहे.
◼️प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:
* कवरेज: कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यातील १०४ शासकीय आरोग्य संस्था (१ सामान्य रुग्णालय, ५ उपजिल्हा रुग्णालये, १५ ग्रामीण रुग्णालये आणि ८३ प्राथमिक आरोग्य केंद्र) या डिजिटल यंत्रणेशी जोडल्या जाणार आहेत.
* रिअल-टाइम मॉनिटरिंग: या प्रणालीद्वारे डॉक्टरांची उपस्थिती, रुग्णांची संख्या, प्रतीक्षा वेळ, स्वच्छता आणि आपत्कालीन घटनांवर (उदा. आग किंवा अचानक रुग्ण कोसळणे) एआयच्या माध्यमातून थेट लक्ष ठेवले जाईल. यासाठी नवीन सीसीटीव्हीची गरज नसून आधीच्याच यंत्रणेचा वापर होईल.
* ऑटोमॅटिक अलर्ट: रुग्णालयात त्रुटी किंवा आपत्कालीन स्थिती आढळल्यास, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ एआय प्रणालीद्वारे अलर्ट पाठवला जाईल.
* उत्तरदायित्व: यामुळे कर्मचाऱ्यांचे उत्तरदायित्व वाढून कामात कसूर किंवा दांडी मारण्याला आळा बसेल.
कोल्हापूरच्या या यशस्वी प्रयोगानंतर हा महत्त्वाकांक्षी व क्रांतिकारक प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात लागू केला जाणार आहे.