आजऱा तालुक्यातील दुर्घटना : परोली बंधाऱ्यात बुडून तिघांचा मृत्यू
schedule29 Dec 24 person by visibility 224 categoryगुन्हे
आजरा : आजऱ्याजवळील परोली बंधाऱ्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. मयतामध्ये ख्रिश्चन समाजातील दोन सख्खे भाऊ रोझारीओ अंतोन कुतिन्हो , फिलिप अंतोन कुतिन्हो यांच्यासह लॉईड पास्कोन कुतिन्हो यांचा समावेश आहे. नाताळच्या सणासाठी सर्वजण एकत्र जमले होते.
आज दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ते पोहण्यास गेले होते. धरणातून पाणी सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा वेग वाढला होता. बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे प्रथम रोझारीओ व फिलीप पाण्यात बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी लॉईड गेला असताना तोही बुडाला.
दरम्यान दुर्घटनेनंतर परोली बंधाऱ्यावर एकच गर्दी जमली होती. सायंकाळी उशिरा ग्रामस्थांच्या मदतीने तिघांचेही मृतदेह बंधाराच्या पाण्यातून बाहेर काढले. रोझारीओ कुतिन्हो हे वकील, फिलिप कुतिन्हो हे आयटी इंजिनीयर तर लॉईड पास्कोन कुतिन्हो हे मर्चेंट नेव्हीमध्ये नोकरीस होते.