राधानगरी : कासारपुतळेतील जवान प्रमोद पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार
schedule01 Jan 25 person by visibility 317 categoryराज्य
कोल्हापूर : कासारपुतळे (ता. राधानगरी) येथील जवान प्रमोद विश्वास पाटील (वय ३५) यांचा तीन महिन्यापूर्वी अपघात झाला होता. त्यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मृत्युशी झुंज सुरु असताना रात्री त्यांची प्राणजोत मावळली. ग्रामस्थ यांनी जवानाच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. आयटीबीएफच्या जवानांनी मानवंदना दिली.
प्रमोद पाटील हे सन २०११ साली इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस फोर्स (आयटीबीएफ) मध्ये भरती झाले होते. सध्या ते उतराखंड येथे सेवा बजावत होते. दसरा सण दरम्यान प्रमोद हे एक महिना सुट्टी साठी गावी आले होते. १३ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर-गारगोटी रोडवर अपघात होऊन डोक्याला मार लागला होता. त्यांच्यावरती गेले तीन महिने कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, पाच वर्षाचा मुलगा, आणि तीन महिन्याची मुलगी असा परिवार आहे.
गावातील प्रमुख मार्गावरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. दूधगंगा नदी तीरावर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या जवानाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी मान्यवरांनी जवानास श्रद्धांजली वाहिली.