भारतीय भूचुंबकत्व संस्थेच्या सहकार्याने विद्यापीठात शुक्रवारी राष्ट्रीय कार्यशाळा; बदलत्या वातावरणाचा सखोल अभ्यास शक्य
schedule01 Jan 25 person by visibility 182 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा भौतिकशास्त्र अधिविभाग आणि नवी मुंबई येथील भारतीय भूचुंबकत्व संस्था (भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागांतर्गत स्वायत्त संस्था) यांच्या संयुक्त विद्यमाने “अॅटमॉस्फिअर-आयनोस्फिअर डायनॅमिक्स: ऑब्झर्व्हेशन्स अँड डेटा अॅनालिसिस (AIDON 2025)” या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी (दि. ३) भौतिकशास्त्र अधिविभागात कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेत देशभरातील राष्ट्रीय संशोधन संस्थांमधील शंभरहून अधिक युवा संशोधक, पदव्युत्तर व पीएच.डी. स्तरावरील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
भारतीय भूचुंबकत्व संस्थेचे संचालक प्रा. ए. पी. डिमरी यांच्या हस्ते आणि कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. कार्यशाळेत एस. गुरुबरण, डॉ. आलोक ताओरी, डॉ. सतीशकुमार, डॉ. श्रीपती, डॉ. राजीव व्हटकर, डॉ. गोपी सिमला आणि डॉ. नवीन परिहार यांची विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. या कार्यशाळेमध्ये विषयतज्ज्ञांच्या व्याख्यानाबरोबरच डेटा विश्लेषण तंत्रांवरील सत्रे आणि प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत.
वातावरणातील आयनोस्फिअर प्रणालीतील गतिशीलतेचा सखोल अभ्यास करून निरीक्षणाच्या पद्धती आणि डेटा विश्लेषणाच्या तंत्रांचा परिचय करून देणे हा कार्यशाळेचा हेतू आहे. खालचे वातावरण असलेल्या आयनोस्फिअर प्रणालीचा अभ्यास अधिक प्रभावी स्पेस वेदर प्रेडिक्शन मॉडेल तयार करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो, ज्यामुळे सॅटेलाइट नेव्हिगेशन आणि संवाद प्रणालींसारख्या तांत्रिक प्रणालींचे संरक्षण करता येते. तसेच, हवामानशास्त्र, आयनमंडल गतिकी, संबंधित डेटा विश्लेषणाच्या क्षेत्रात संशोधक विद्यार्थ्यांना नव्या ज्ञानाच्या संधी उपलब्ध करून देणे हा सुद्धा आहे. ही कार्यशाळा अंतराळ विज्ञानामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या पदव्युत्तर आणि पीएच.डी. विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रेरित करेल, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.आर.जी. सोनकवडे यांनी दिली आहे.