"वाचन संकल्प महाराष्ट्राचा" उपक्रम डॉ. बापूजी साळुंखे इंजीनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात
schedule02 Jan 25 person by visibility 310 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इंजीनिअरिंग इन्स्टिट्यूट, कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र शासनाच्या "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" उपक्रमांतर्गत वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि त्यांची वाचन कौशल्ये विकसित करणे हा आहे. ०१ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ या पंधरवड्यामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमाची सुरवात आज करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी , इन्स्टिटयूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे आणि प्रा. अशोक कोळेकर यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आली. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संचालक प्रा. विरेन भिर्डी यांनी ‘वाचन सवयीचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्याचे आवाहन केले’. तसेच प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी कविवर्य ना. धो . महानोर यांची " अक्षर चुरगाळिता मी " व् खलील मोमिन यांची " जे उरात उरते" ह्या मार्मिक मराठी कविता सादर करत ‘वाचनातून घडणाऱ्या सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिकत्वावर भाष्य केले’. त्याचबरोबर कार्यक्रमात वाचन कौशल्य कार्यशाळा घेण्यात आली, ज्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक प्रा. अशोक कोळेकर यांनी विद्यार्थांना वाचनाचे महत्त्व, योग्य वाचन तंत्र, आणि वाचनातून होणारे शैक्षणिक व वैयक्तिक फायदे यावर विस्तृत मार्गदर्शन केले. त्यांनी वाचन कौशल्य वाढविण्यासाठी प्रात्यक्षिकेही सादर केली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना वाचन कौशल्यांचा सराव करण्यास प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये सामूहिक वाचन सत्र आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये साहित्यप्रेमी विद्यार्थ्यांनी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रेरणादायी चरित्राचे वाचन केले. पदवी आणि पदविका अभियन्त्रिकीच्या अनेक विद्यार्थ्यांनी या सत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रा. तन्मय कुलकर्णी आणि प्रा. सुदर्शन महाडिक यांनी हि वाचनाच्या योग्य पद्धतींचे प्रात्यक्षिक दाखवत विद्यार्थ्यांना वाचन सुलभ करण्याच्या टिप्स दिल्या.
या उपक्रमासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्रा. शुभांगी गावडे यांचे प्रोत्सहान व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचा समारोप ग्रंथपाल श्री. महेश देसाई यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.